लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर द्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Give speed to vaccination DM order
लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर द्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानांतर्गत विविध उपक्रम
वाशिम, दि. १३ (जिमाका) : नीती आयोग, जिल्हा प्रशासन आणि पिरॅमल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ या अभियानांतर्गत जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. या अभियानाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज, १३ जुलै रोजी झालेल्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक तथा प्राथमिक) रमेश तांगडे, पिरॅमल फाऊंडेशनचे अमित गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे, मात्र कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेवून जिल्ह्यातील लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे. पिरॅमल फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरणबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांची यासाठी मदत घ्यावी. ज्या गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा गावातील लोकांशी संपर्क साधून त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे. या कामामध्ये प्रशासकीय स्तरावर आवश्यक सहकार्य उपलब्ध केले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत दुसरा डोस घेण्यासाठी पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच महिलांमध्ये सुद्धा लसीकरणाविषयी काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. सध्या प्रत्येक तालुकास्तारवर गटशिक्षणाधिकारी हे लसीकरणाविषयी जनजागृती मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून काम करीत आहेत, पिरॅमल फाऊंडेशनने त्यांच्यासोबत संपर्क करून त्यांना सहकार्य केल्यास लसीकरणाची गती वाढण्यास मदत होईल. ग्रामीण भागामध्ये संबंधित भागातील बोलीभाषेचा वापर करून जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पिरॅमल फाऊंडेशनचे श्री. गोरे यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेह सध्या कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जाणार असून पिरॅमल फाऊंडेशनमार्फत १०० स्वयंसेवक यामध्ये कार्यरत राहतील, असे त्यांनी सांगितले.
Post a Comment