Header Ads

पात्र विधवा महिलांना निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Follow up to give the benefit of Niradhar Yojana to eligible widows - Collector Shanmugarajan S.



पात्र विधवा महिलांना निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

जिल्हास्तरीय कृती दलाची आढावा बैठक

वाशिम, दि. ०८ (जिमाका) : कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यामुळे विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तातडीने मिळवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ८ जुलै रोजी झालेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रभारी जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांच्यासह कृती दलाचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या ५ असून या मुलांना शासनाच्या निर्देशानुसार लाभ मिळवून देण्याची कार्यवाही त्वरित करावी. तसेच एक पालक गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. कोरोनामुळे विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याबाबत यापूर्वी सूचित करण्यात आले आहे. सदर महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने सर्व तहसीलदारांशी समन्वय साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

श्री. राठोड यांनी जिल्हास्तरीय कृती दलामार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) यांच्यामार्फत एक पालक आणि दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा १७७ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.