Header Ads

लसीकरण आणि कोरोना चाचणीवर लक्ष केंद्रित करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस - focus on vaccination and corona testing DM order



लसीकरण आणि कोरोना चाचणीवर लक्ष केंद्रित करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

वाशिम दि. 12 (जिमाका) कोरोनाचा प्रतिबंधक करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक असून पात्र व्यक्तींचे वेळीच लसीकरण करण्यात यावे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तसेच कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची त्वरीत कोरोना चाचणी करण्यात यावी. संबंधित यंत्रणांनी जास्तीत जास्त कोरोना लसीकरण आणि कोरोना चाचणीवर लक्ष केंद्रित करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

आज 12 जुलै रोजी तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना लसीकरण आणि कोविड उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यावेळी उपस्थित होते.

भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता यंत्रणांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगून श्री षण्मुगराजन म्हणाले, जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता यंत्रणांनी कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी. ज्या पात्र लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्या लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून संबंधित लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी निश्चित केलेला तारखेला बोलावून घ्यावे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने करावे. दररोज प्रत्येक तालुक्यात 300 कोरोना चाचण्या नियमीतपणे करण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नऊ लाख 90 हजार पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, पहिला आणि दुसरा असे दोन्ही मिळून 20 लाख डोसेस जिल्ह्यातील पात्र व्यक्तींना देण्यात येणार आहे. आतापर्यंत 60 वर्षावरील 50 टक्के व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. 18 ते 44 वयोगटातील 17 टक्के व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे, ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे लागणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला पाहिजे, यासाठी त्यांच्या भेटी घेऊन त्यांना लसीकरणासाठी यंत्रणांनी प्रोत्साहित करावे. लस वाया जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांनी नियोजन करून एखादे गाव निवडून तेथे 100 टक्के लसीकरण करावे. त्या गावाची प्रेरणा इतर गावांना घेता येईल, असे ते म्हणाले.

श्रीमती पंत म्हणाल्या, गटविकास अधिकारी यांनी कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करावा. यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन दुसरा डोस घेण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. गरोदर महिला आणि स्तनदा माता यांचेसुद्धा कोरोना लसीकरण करावे. लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त ग्रुह भेटीवर भर द्यावा असे त्या म्हणाल्या.

डॉ. आहेर म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्यातील 4 लाख पात्र व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 8 हजार डोसेस उपलब्ध आहे. 5 ते 18 जुलैपर्यंत 38 हजार 562 डोसेस देण्यात आले आहे. लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासोबत शेतीत कामासाठी जाणारे शेतकरी व कामगार वर्ग लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 वाजतापर्यंत अशी निश्चित करून लसीकरण करण्यात येत आहे. जास्तीत जास्त लसीकरण व कोरोना चाचणीवर आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सभेत सहभागी झालेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी,नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी कोरोना लसीकरण आणि कोविड उपाययोजनेबाबतची माहिती दिली.

No comments

Powered by Blogger.