Header Ads

कोरोनापासून बचावासाठी लसीकरण आवश्यकच vaccination must for preventing corona - Dr Manjushri Jambharunkar, डॉ. मंजुश्री जांभरुणकर

Dr Manjusha Jambharunkar, डॉ. मंजुश्री जांभरुणकर

कोरोनापासून बचावासाठी लसीकरण आवश्यकच - डॉ. मंजुश्री जांभरुणकर

कोविड-१९ ची साथ आटोक्यात आणण्यासाठी भारतासह अनेक देशात लसीकरण मोहीम चालू आहे. एखादा आजार किंवा विषाणू संक्रमणाविरुद्ध कसे लढायचे, हे लस शरीराला शिकविते. एखाद्या रोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचा कमकुवत किंवा निष्क्रिय अंश वापरून लस तयार केली जाते. ही लस शरीरात गेली की जणू काही त्या रोगाची रंगीत तालीम होते. सबल जंतू नसल्याने रोग होत नाही, पण शरीराला त्या रोगजंतूशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. म्हणजे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला शरीरात शिरकाव केलेल्या लसीतील विषाणूला ओळखता येते आणि त्याच्याविरोधात लढण्यासाठी शरीरात ‘अँटिबॉडीज’ तयार होतात. थोडक्यात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लस देणे गरजेचे असते. लसीकरणाने आजाराची तीव्रता कमी केली जाते  किंवा काही आजार टाळले जातात.

कोविड-१९ लसीकरणाविषयी काही समज-गैरसमज सध्या खूप जोर धरत आहेत. जसे की, कोविड-१९ च्या लसीकरणामुळे स्त्री-पुरुषांना वंध्यत्व येणे, लस गाईच्या-वासराच्या रक्तद्रव्यापासून तयार केली आहे, यासारखे अनेक गैरसमज समाजात पसरले असून हे सर्व चुकीचे आहेत. मासिक पाळीत लस घेवू नये, असाही अपप्रचार केला जात आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. पाळीमध्ये लस घेतल्यास दुष्परिणाम होत नाही. तसेच कोविड-१९ लस घेतल्यावर कोरोना होतो किंवा मृत्यू होतो, असे म्हणून बरेच लोक लसीकरणास विरोध करतात. खरे तर लसीमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होवून रोगापासून बचाव होतो.

भारतात तिसरी लाट येण्यास प्रतिबंध करावयाचा असेल तर लसीकरण हाच प्रभावी व दीर्घकाळ उपाय आहे.  त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोविड-१९ लसीकरणाला प्राधान्य द्यावे. तसेच मुखपट्टिका, परस्परांपासून योग्य अंतर ठेवणे, स्वच्छता आदी नियमांचे पालन करावे. जगभरात यापूर्वी लाखोंचा जीव घेणाऱ्या देवीच्या आजाराचं निर्मुलन हे लसीमुळेच झालं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कोविड-१९ लस घेतल्यानंतर ताप येणे, कणकण वाटणे, किंचित डोकेदुखी यासारखी सामान्य लक्षणे दिसतात. त्याला घाबरण्याची गरज नाही. लसीकरणानंतर ३० मिनिटे डॉक्टरांच्या निगराणीखाली लसीकरण केंद्रावर थांबणे आवश्यक आहे.

भारतात आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला मंजुरी मिळाली आहे. आपल्या जिल्ह्यातही ३० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अपप्रचाराला, गैरसमज, अफवांना बळी न पडता लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून कोविड-१९ आजाराला देशातून हद्दपार करण्यासाठी शासन, प्रशासनाला साहाय्य करावे.

- डॉ. मंजुश्री जांभरुणकर


No comments

Powered by Blogger.