Header Ads

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी district administration prepared for possible third corona wave

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी

  • कोरोना बाधित लहान मुलांवर उपचारासाठी वाशिम येथे १०० खाटांची सज्जता
  • कारंजा येथेही २५ खाटांची सुविधा
  • नवजात शिशु, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग
  • १२ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्ष

वाशिम, दि. २२ (जिमाका) : राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये कोरोना बाधित लहान मुलांवर उपचारासाठी १०० खाटांची स्वतंत्र सुविधा तयार करण्यात आली आहे. तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथेही लहान मुलांसाठी २५ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका निर्माण होवू शकतो, असा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला असल्याने जिल्ह्यात कोरोना बाधित लहान मुलांवरील उपचारासाठी सर्व सोयी-सुविधायुक्त स्वतंत्र कक्ष सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये १०० खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्ये नवजात शिशुंसाठी १० खाटांचा अतिदक्षता विभाग, त्यांच्या मातांसाठी स्वतंत्र सुविधा, लहान मुलांसाठी १० खाटांचा अतिदक्षता कक्ष, १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ऑक्सिजन सुविधा असलेल्या ३० खाटांचा स्वतंत्र कक्ष, १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी प्रत्येकी २५ खाटांचा आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आले आहेत.

बालरोग तज्ज्ञ, आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण : डॉ. मधुकर राठोड

कोरोना बाधित लहान मुलांसाठी तयार आलेल्या विविध काक्षांमधील सर्व खाटांना सेन्ट्रल पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभागात ६ इनक्यूबेटर, लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात १० व्हेंटीलेटर, ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ६ बालरोग तज्ज्ञ व १२ स्टाफ नर्सेससह आरोग्य कर्मचाऱ्यांचा चमू याठिकाणी नियुक्त केला जाणार असून सर्वांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच लहान मुलांच्या कक्षामध्ये खेळणी, सायकल, दूरचित्रवाणी संच यासारखी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली असून भिंतीवर विविध कार्टून लावण्यात आली आहेत. जेणेकरून येथे राहणाऱ्या लहान मुलांच्या मनातील भीती दूर होवून ते खेळीमेळीत राहू शकतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.