वाशिम जिल्हा परिषदेमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ उत्साहात साजरा shiv swarajya din in washim zp
वाशिम जिल्हा परिषदेमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ उत्साहात साजरा
स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी
वाशिम, दि. ०६ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ साली झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा दिवस सर्वात मंगलमय दिवस आहे. यावर्षीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज, ६ जून रोजी स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार अॅड. किरणराव सरनाईक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषद सदस्य ओंकार सुरकुटे, कल्पना राऊत, कांचन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्राच्या इतिहासात ६ जून हा सर्वात मंगलमय दिवस आहे. ६ जून १६७४ या मंगलमय दिनी शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला आणि राजे 'छत्रपती' झाले. आजच्याच शुभ दिनी शिवाजी महाराजांनी आपल्या सार्वभौमत्वाचा मंगल कलश जनतेला अर्पण करून समृद्धीचे दिवस आणले. त्यामुळे दरवर्षी ६ जून हा दिवस 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये हा दिवस स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून व त्यास नमन करून साजरा केला जाणार आहे.
वाशिम जिल्हा परिषद प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्य हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून व त्यास नमन करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी जि. प. अध्यक्ष डॉ. गाभणे, आमदार श्री. सरनाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत गायनाने शिवराज्य दिन सोहळ्याची सांगता झाली.
Post a Comment