Header Ads

जिल्ह्यात २१ जूनपासून कृषि संजीवनी मोहीम krushi sanjiv ani mohim from 21 june

धुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात २१ जूनपासून कृषि संजीवनी मोहीम

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून केले जाणार मार्गदर्शन

वाशिम, दि. १७ (जिमाका) : खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत ‘कृषि संजीवनी मोहीम’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषि मित्र, प्रयोगशील शेतकरी तसेच प्रगतशील शेतकरी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करणार आहेत.

२१ जून ते १ जुलै २०२१ दरम्यान प्रत्येक कार्यालयीन दिवशी कृषि क्षेत्राशी निगडीत महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर दिला जाणार आहे. या अंतर्गत २१ जून रोजी बी. बी. एफ. तंत्रज्ञान-रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान, २२ जून रोजी बीज प्रक्रिया, २३ जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, २४ जून रोजी एक गाव-एक वाण असणाऱ्या क्षेत्रासाठी सुधारित पिक लागवड तंत्रज्ञान, २५ जून रोजी ‘विकेल ते पिकेल’ अभियान, २८ जून रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, २९ जून रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, ३० जून रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना व १ जुलै रोजी कृषि दिनाचे औचित्य साधून कृषि संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात येईल.

या मोहिमेत कृषि विद्यापीठाचे संशोधित व अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा मानस आहे. तसेच कृषि विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती या मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. प्रगतशील शेतकऱ्यांच्या व्हॉटसअप ग्रुपद्वारे या योजनेचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. यु-ट्यूब चॅनेलवर प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथेच्या चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. तरी शेतकरी जास्तीत जास्त संख्येने कृषि संजीवनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.