Header Ads

जनआरोग्य योजनांच्या अंमलबजावणीविषयी प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा - implementation of jan arogya yojana monitored by DM

जनआरोग्य योजनांच्या अंमलबजावणीविषयी प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

  • जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीची सभा
  • ५१ पैकी तक्रारींचा ३६ तक्रारींचा निपटारा

वाशिम, दि. १४ (जिमाका) : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीची सभा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आज, १४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झाली. या सभेत योजनेच्या अंमलबजावणीविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे, डॉ. संदीप हेडाऊ, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रणजीत सरनाईक यांच्यासह महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालयांचे डॉक्टर, प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रित स्वरुपात राबविली जात आहे. ३ शासकीय आणि ९ खाजगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. या योजनांची माहिती प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी. अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित रुग्णालयाने सुद्धा विशेष प्रयत्न करावेत. रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांना योग्य माहिती देवून त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. जेणेकरून तक्रार करण्याची वेळ रुग्णांवर येणार नाही. सदर रुग्णालयातील आरोग्य मित्रांनी योजनांची तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना द्यावी. तसेच त्यांना योजनेचा लाभ घेण्याविषयी आवश्यक योग्य मार्गदर्शन करावे.

डॉ. सरनाईक म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. या योजनांची माहिती रुग्णांना देण्यासाठी सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६४०२ रुग्णांवर या योजनेतून उपचार करण्यात आले असून या उपचारासाठी २४ कोटी ६२ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत कोविड-१९ वरील उपचारासाठी २० पॅकेजेस व म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी १९ पॅकेजेस उपलब्ध आहेत. योजनेच्या अनुषंगाने १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत ५१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून १५ तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु असल्याचे डॉ. सरनाईक यांनी सांगितले.

जिल्हा समन्वयकाकडे तक्रार सादर करता येईल

जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असून प्रति कुटुंबाला १.५ लक्ष रुपयांच्या मर्यादेत विविध ९९६ आजारांवर उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपणसाठी २.५ लक्ष रुपये प्रति वर्ष रुपयांची मर्यादा आहे. तसेच आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी २०११ च्या सामाजिक आर्थिक जातीय जनगणनेच्या आधारे लाभार्थी निवड करण्यात आली आहे. या लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष ५ लक्ष रुपयांचे आरोग्य विमा कवच देण्यात आले असून त्यांना विविध १२०९ उपचार उपलब्ध आहेत. या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात रुग्णांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.