Header Ads

'एक गाव, एक वाण’ साठी कारंजा तालुक्यातील ९ गावांची निवड ek gav ek wan smart cotton

 


'एक गाव, एक वाण’ साठी कारंजा तालुक्यातील ९ गावांची निवड

वाशिम, दि. १९ (जिमाका): राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट कॉटन या उपप्रकल्पासाठी कारंजा तालुक्यातील ९ गावांची निवड करण्यात आली आहे. या ९ गावांमध्ये ‘एक गाव, एक वाण’ या संकल्पनेवर भर देत कापूस उत्पादन केले जाणार आहे.

कारंजा तालुक्यातील वाई, वढवी, पोहा, जानोरी, पानगव्हाण, गायवळ, सोहळ, भडशिवणी व महागाव या ९ गावांची निवड स्मार्ट कॉटन या उपप्रकल्पासाठी करण्यात आली आहे. या गावांमध्ये कापसाच्या उत्पादनासाठी महाकॉट, तिरुमला जिनिंग, कारंजा यांची मदत घेतली जात आहे. ‘एक गाव, एक वाण’ ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी पिक प्रात्याक्षिके, शेतीशाळा यासह अन्य उपक्रम राबविले जात आहेत. बियाण्यांच्या निवडीपासून तर पिकाची मशागत, किडींचे नियंत्रण, कापसाची वेचणी यासह अन्य महत्वाच्या बाबींवर शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठाचे अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक मार्गदर्शन करीत आहेत.

भडशिवणी येथे ‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्प अंतर्गत आयोजित कार्यशाळेत बोलताना मंडळ कृषि अधिकारी संतोष चौधरी यांनी सांगिलते की, कापूस मूल्य साखळी अधिक कार्यक्षम, सर्वसमावेशक व स्पर्धाक्षम करण्यासाठी ‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्प राबविला जात आहे. तसेच रुई आधारित बाजारव्यवस्थेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून उत्पादित कापसाला योग्य मोबदला मिळवून देणे व कापसाचा स्मार्ट कॉटन ब्रँड विकसित करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा अंबाळकर होत्या. यावेळी उपसरपंच रवींद्र लाहे, प्रगतशील शेतकरी रुपेश लाहे, विष्णू लाहे व गावातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.