Header Ads

वाशिम दि.३० - जिल्ह्यात १३४ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस उपलब्ध covaccine second dose available at 134 centers in Washington district



वाशिम जिल्ह्यात १३४ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस उपलब्ध

  • दोन्ही डोस घेतल्यानंतरच पुरेशी रोगप्रतिकारशक्ती
  • जिल्ह्यातील २१ हजार नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र
  • सर्व केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांसाठी पहिला डोसही उपलब्ध

वाशिम, दि. ३० (जिमाका) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस २८ दिवसानंतर, तसेच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जातो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेले २१ हजार ७७३ नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. दुसऱ्या डोससाठी जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठा प्राप्त झाला असून नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. याकरिता जिल्ह्यात १३४ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सध्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांना कोविशिल्ड व  कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस लसीच्या उपलब्धतेनुसार दिला जात आहे. मात्र, यापूर्वी ज्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोससाठी पुरेसा साठा सर्व १३४ लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेवून २८ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीचा दुसरा डोस घ्यावा.

दोन्ही लसी सारख्याच परिणामकारक व सुरक्षित : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनावरील लस हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे लसीबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून १८ वर्षावारील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी सुरक्षित असून त्या सारखेच काम करतात. रुग्णाला लस दिल्यानंतर दोन्ही लसीचा फायदासुद्धा एकसारखाच होतो. कोरोना लसीसंदर्भात पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनी विहित कालावधीत दुसरा डोस घेवून स्वतःला सुरक्षित करावे. तसेच अद्याप एकही डोस न घेतलेल्या नागरिकांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

विहीत कालावधी दुसरा डोस घेणे गरजेचे : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण होते. पुरेशा प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लसींचे दोन्ही डोस विहीत कालावधीत घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी २८ दिवसानंतर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस, तसेच कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी ८४ दिवसांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घ्यावा. जिल्ह्यातील १३४ लसीकरण केंद्रांवर पहिल्या व दुसऱ्या डोससाठी पुरेशा लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.