Header Ads

गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करणाऱ्यांवर होणार कारवाई action against illegal learning licencee

Rto washim

 गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करणाऱ्यांवर होणार कारवाई

  • अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरविणार
  • सहाय्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांवर सुद्धा गुन्हे दाखल करणार

वाशिम, दि. १८ (जिमाका): नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना (लर्निंग लायसन्स) ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली १४ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवारांऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारे गैरमार्गाने अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांना अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी कळविले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम ११ अन्वये शिकाऊ अनुज्ञप्ती अर्ज करतांना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्व समजावे, हा त्यामागील उद्देश आहे. ऑनलाईन प्रणालीचा वापर करताना पालकांनी त्यांच्या पाल्यास सदर परीक्षेचे महत्व पटवून द्यावे, तसेच उक्त प्रणालीचा गैरवापर होणार नाही, याची जाणीव करून द्यावी. 

लोकाभिमुख सोयी-सुविधांचा गैरवापर होऊ नये, यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रणालीचा गैरवापर करून लर्निंग लायसन्स प्राप्त करणाऱ्या अर्जदाराची तपासणी करण्यात येवून गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्यास अर्जदाराविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच मोटार वाहन कायदा १९८८ कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल. गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास सहाय्य करणाऱ्या अनधिकृत व्यक्ती, मध्यस्थ, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, सायबर कॅफे यांचेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांची अनुज्ञप्ती रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, श्रीमती सय्यद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच नागरिकांनी गैरप्रकार करून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) प्राप्त करून देणाऱ्या व्यक्ती, संस्थांची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास कळविण्याचे आवाहन केले आहे.

No comments

Powered by Blogger.