Header Ads

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची गती वाढवा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Accelerate the corona preventive vaccination campaign

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची गती वाढवा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

  • वयोवृद्ध, दिव्यांग नागरिकांच्या लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करा
  • कोरोना चाचण्या, लसीकरणासाठी स्वतंत्र पथके तयार करा

वाशिम, दि. ०१ (जिमाका) : जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने तत्पूर्वी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे. तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन करून लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, १ जून रोजी आयोजित तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर, संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार शीतल सोलट व जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

जिल्हाधिकरी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील वयोवृद्ध तसेच ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तींची गावनिहाय यादी तयार करावी. याकरिता समाज कल्याण विभागाशी संपर्क करून त्यांच्याकडून दिव्यांगाची यादी उपलब्ध करून घ्यावी. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने आता लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करून ४५ वर्षांवरील जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण वेळेत पूर्ण करावे.

शहरी भागात लसीकरणासाठी वार्डनिहाय नियोजन करावे. तसेच लसीकरणाविषयी जनजागृतीवर भर द्यावा. ४५ वर्षांवरील दुकानदार, आस्थापनाधारक व्यावसायिक यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी नगरपरिषदेने योग्य नियोजन करावे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, गतिमंद, भिकारी तसेच बेघर असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. प्रत्यक्ष लसीकरण करताना क्षेत्रीय पातळीवर काही अडचणी येत असल्यास त्याबाबत कळवावे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी चाचण्यांचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी सुद्धा नियोजन करावे. कोरोना चाचण्या व लसीकरणासाठी स्वतंत्र पथके तयार करावीत. जिल्ह्यात निर्बंध शिथिल केल्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बाजारपेठ, बँक येथे कोरोना चाचणी शिबिरे घ्यावीत. सर्व दुकानदार, आस्थापनाधारक यांच्या नियमित कोरोना चाचण्या कराव्यात, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले. ‘म्युकरमायकोसीस’ची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करावे. याकरिता संबंधित पथकांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी लसीकरण कमी झाले आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी तालुकास्तरावर तसेच गाव पातळीवर लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून लसीकरण करावे. तसेच ‘म्युकरमायकोसीस’च्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीमध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व नगरपरिषद, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सहभागी होते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.