Header Ads

पात्र दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Special task for Vaccination of Diyyang

पात्र दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

  • कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्याच्या सूचना
  • ‘म्युकरमायकोसीस’च्या अनुषंगाने सर्वेक्षण करा

वाशिम, दि. ३१ मे २०२१ (जिमाका) : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. याकरिता त्यांची गावनिहाय माहिती संकलित करून त्यानुसार सूक्ष्म नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची गती वाढविण्याच्या निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ३१ मे रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर, संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त माया केदार व वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींची गावनिहाय यादी तयार करून यापैकी किती दिव्यांग व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही, याची माहिती संकलित करावी. ही कार्यवाही तातडीने करून अद्याप लस न घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. जिल्ह्यातील ज्या गावातील एकाही व्यक्तीने आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीची एकही मात्रा आजपर्यंत घेतलेली नाही, अशा गावांमध्ये लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करावेत. या गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करावे, तसेच लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन शहरी व ग्रामीण भागामध्ये सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करावे. जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या काही व्यक्तींना म्युकरमायकोसीस झाल्याचे आढळून आले आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती कोरोना संसर्गातून बऱ्या झाल्यानंतर त्यांना म्युकरमायकोसीस संसर्ग होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यात मधुमेह असलेल्या ज्या व्यक्ती रुग्णालयात उपचार घेवून घरी परतल्या आहेत, अशा व्यक्तींचे आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीसची लक्षणे आहेत का, याचा शोध घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी कोरोना चाचणीचे प्रमाण कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील दुकानदार, आस्थापनाधारक यांच्या नियमित कोरोना चाचण्या करण्यासाठी नियोजन करावे. तसेच ४५ वर्षांवरील दुकानदार, आस्थापनाधारक यांचे लसीकरण करून घ्यावे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाधित व्यक्तींचे संस्थात्मक विलगिकरण करण्यात येत आहे. शहरी भागातसुद्धा बाधित व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरणाचे प्रमाण वाढविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, ग्रामीण भागात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात येईल. त्यांच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. तसेच ग्रामीण भागात देखील जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्यावर आपला भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण, कोरोना चाचणी, कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील सद्यस्थिती, म्युकरमायकोसीस, संस्थात्मक विलगीकरण व नव्याने प्राप्त रुग्णवाहिकेबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.