Header Ads

दि ०२-०५-२०२१ - वाशिम जिल्ह्यात १५ मे पर्यंत संचारबंदी आदेश कायम DM Order - Curfew till May 15 in Washim district

वाशिम जिल्ह्यात १५ मे पर्यंत संचारबंदी आदेश कायम

  • आंतर जिल्हा, आंतर शहर प्रवासावर निर्बंध
  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार
  • कृषि सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

वाशिम, दि. ०२ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशांना १५ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला योग्य कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही. तसेच परवानगी दिलेल्या बाबी वगळता इतर सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, सर्व प्रकारच्या कृती व सेवा बंद राहणार आहेत. तसेच जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग, अंत्यसंस्कार अथवा कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असेल तरच आंतर जिल्हा किंवा आंतर शहर प्रवासाची मुभा राहणार आहे. तसेच आंतर जिल्हा किंवा आंतर शहर प्रवास करून आलेल्या व्यक्तींना १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार बस गाड्या वगळता इतर खाजगी प्रवासी वाहतूक केवळ अत्यावश्यक किंवा आपत्कालीन सेवेसाठी किंवा वैध कारणांसाठी वापरता येईल. त्यासाठी चालक आणि प्रवासी आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी ही कमाल मर्यादा राहणार आहे. आंतर जिल्हा किंवा एकाच शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास वाहतूक नाही, सदरची व्यवस्था ही केवळ स्थानिक प्रवासासाठी, शहरापुरती मर्यादित राहील. जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग, अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असल्यास आंतर जिल्हा आणि आंतर शहर प्रवासाला मुभा राहील. या आदेशाचा भंग केल्यास १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

आंतर जिल्हा किंवा आंतर शहर प्रवास करण्यासाठी खाजगी बस गाड्यासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. यानुसार बस सेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. सर्व थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणाचा शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल. हे शिक्के मारण्याची व्यवस्था बस कंपनीने करायची आहे. थर्मल स्कॅनरचा उपयोग करून प्रवाशांची तपासणी करावी, कोणत्याही प्रवाशांना कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात पाठविण्यात येईल. या अटींचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि असे उल्लंघन वारंवार केले जात असल्यास त्याचा परवाना कोविड-१९ आपदा घोषित असेपर्यंत रद्द करण्यात येईल.

सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये राज्य शासनाच्या मालकीच्या सार्वजनिक बसेसमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी घेता येतील. कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करू शकणार नाही. रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यामधून प्रवास करणाऱ्या यात्रेकारुंच्या तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी लागेल. ज्या-ज्या ठिकाणी प्रवासी उतरतील, त्या-त्या ठिकाणी सर्व प्रवाशांच्या हातावर १४ दिवसांसाठी गृह विलगीकरणचा शिक्का मारण्यात येईल. थर्मल स्कॅनरद्वारे या प्रवाशांची तपासणी केली जाईल व लक्षणे आढळल्यास कोविड केअर सेंटर अथवा रुग्णालयात पाठविण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई, चिकन, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी विक्रीची दुकाने, पशुखाद्यांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु राहतील. याशिवाय ‘होम डिलिव्हरीसाठी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व वैद्यकीय सेवा, त्यासंबंधित इतर सेवा २४ तास सुरु राहतील. स्थानिक खाजगी वाहतूक सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक नियमितरित्या सुरु राहील. जिल्ह्यात दुध संकलन व विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मुभा राहील. दुध व्यावसायिक दुध वितरणासाठी सकाळी ७ पूर्वी शहरामध्ये येवू शकतील, तसेच सायंकाळी ७ वाजेनंतर घरी जावू शकतील. मात्र, त्यांच्याकडे दुधाची कॅन सोबत असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात बियाण्यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील महाबीज, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषि विज्ञान मंडळाची बीज प्रक्रिया केंद्रे सुरु ठेवण्यास  मुभा देण्यात आली आहे. मात्र, सदर बीज प्रकिया केंद्रांमध्ये कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित कार्यालयांनी ओळखपत्र प्रदान करावे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सदर ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील.जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, त्याच्याशी निगडीत उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर निविष्ठा वाटप, ई-कॉमर्सद्वारे (ऑनलाईन) विक्री इत्यादी पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध करून देण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे.

अत्यावश्यक बाबीतील सर्व हार्डवेअर्सची दुकाने व कृषि संबंधित सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना कृषि संबंधित साहित्याची आवश्यकता असेल त्यांनी संबंधित दुकानदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे मागणी नोंदवून संबंधित ग्राहकाने स्वतः ही वस्तू दुकानातून घेवून जावी. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत केवळ त्या वेळेपुरतेच हे दुकान माल, वस्तू देण्याकरिता उघडता येईल. इतर कोणत्याही परिस्थितीत दुकानदार यांनी दुकानातून मालाची विक्री करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोविड-१९ व्यवस्थापनाच्या थेट आपत्कालीन सेवा वगळता इतर राज्य, केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीत कामकाज करतील. विभाग प्रमुख १५ टक्के पेक्षा जास्त उपस्थितीचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या परवानगीने घेऊ शकतील. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणी पुरवठा, नगरपालिका व विद्युत वितरण कंपनीची कार्यालये २४ तास सुरु राहतील.

जिल्ह्यातील सर्व कायालये, बँक, विमा कार्यालये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहतील. एटीएम सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला व फळांची दुकाने, डेअरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सुरु राहतील, इतर सर्व दुकाने बंद राहतील.

परवानगी देण्यात आलेल्या सर्व आस्थापना, कार्यालये, दुकानांना कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच या आदेशात नमूद बाबीं व्यतिरिक्त १४ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशातील इतर बाबी तशाच राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

घरपोच मद्यविक्रीस सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मुभा

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत नमुना एफ-२ फोर्म ई, फॉर्म ई-२ व एफएलडब्ल्यू-२ या अनुज्ञप्तीतून घरपोच मद्यविक्रीस मुभा राहील. तसेच या कालावधीत नमुना सीएल-३ अनुज्ञप्तीतून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच मद्यविक्री करता येईल. कोणत्याही परिस्थितीत मद्यविक्रीची दुकाने उघडून ‘टेक अवे’ किंवा पार्सल पद्धतीने दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानास भेट देता येणार नाही. माल वाहतुकीचा समावेश अत्यावशक सेवेमध्ये असल्याने मद्य उत्पादित होत असलेल्या ठिकाणापासून घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना मद्य पुरवठा करण्यासाठी परवानगी राहील. ‘होम डिलिव्हरी’साठी कार्यरत व्यक्तींना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निर्गमित केलेले ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे.

पेट्रोल विक्रीला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच मुभा

शहरातील व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंपावर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच पेट्रोल विक्रीला मुभा राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, रुग्णवाहिका व मालवाहतुकीची इतर वाहने यांना नियमितरित्या डिझेलची आवश्यकता असल्याने या पंपांवर डिझेल विक्री पूर्वीप्रमाणे नियमित सुरु राहील. मात्र सकाळी ११ वाजेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल विक्री करता येणार नाही.

विवाह समारंभासाठी २ तासांचा अवधी

विवाह समारंभ आयोजित करताना एकाच समारंभ म्हणून एकाच सभागृहात केला जावा. या समारंभासाठी जास्तीत जास्त २ तासांचा कालवधी आणि २५ व्यक्तींच्या उपस्थितीला मुभा राहील. याचे पालन न करणाऱ्यास किंवा या निर्बंधाचा भंग करीत असलेल्या कुटुंबांना ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि संबंधित सभागृह किंवा समारंभ स्थळ कोविड-१९ आपत्ती घोषित असेपर्यंत बंद ठेवण्यात येईल, असे नवीन नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.