Vardhapan Din

Vardhapan Din

वाशिम दि. 22 - ‘म्युकरमायकोसीस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड Washim CS Dr Madukar Rathod about Mucer mycosis

washim cs dr madhukar rathod
‘म्युकरमायकोसीस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड

वाशिम, दि. २२ (जिमाका) : आज आपण कोविड-१९ या आजाराशी लढत असतांना आणखी एका आजाराने काही रुग्णांना ग्रासले जात आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस (ब्लॅक फंगस) आजाराचा संसर्ग दिसून येत आहे. नागरिकांनी या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.

    म्युकरमायकोसीस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्गित आजार आहे. हा तुलनेने दुर्मिळ पण गंभीर आजार आहे. झिगॉमायकोसिस म्हणून या आजारास ओळखले जाते. एखादा आजार जडल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर हे संक्रमण बहुतेक वेळा दिसून येते. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये याचा संसर्ग जास्त प्रमाणात होतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित झालेल्यांवर उपचारा दरम्यान रेमडेसिवर, स्टेरॉईड व अँटीबायोटिक्सच्या वापराच्या दुष्परिणामामुळे त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार दिसून येत आहे. म्युकरमायकोसीस हा आजार म्यूकोर्मिटाईड मोल्ड्सच्या संपर्कातून उद्भवतो. हे मोल्ड्स झाडाची पाने, कंपोस्टचे ढीग, माती, सडणारे लाकूड यात आढळतात. हे प्रभावित मोल्ड श्वसन यंत्रणेस संसर्गित करतात व त्यातून म्युकरमायकोसीस आजार उद्भवतो. याला फुफ्फुसीय संसर्ग म्हणून संबोधले जाते. केंद्रीय मज्जासंस्था, डोळे, चेहरा, फुफ्फुसे, सायनस, त्वचेवरील जखम किंवा भाजलेली जखम (त्वचेच्या संसर्गातून) या माध्यमातून हे संक्रमण पसरते. प्रत्येकाला बुरशीजन्य संसर्ग होईलच असे नाही. एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास त्याला या प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. 

भाजलेली जखम, कापलेली जखम आणि खरचटलेली जखम, कर्करोग, अलिकडील अवयव प्रत्यारोपण, मधुमेह (विशेषत: जर योग्यरित्या उपचार केला जात नसेल तर), शस्त्रक्रिया, एचआयव्ही किंवा एड्स त्वचेच्या संसर्गासह, आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात म्युकरमायकोसीस संसर्गित करू शकतो. हा सुरुवातीला त्वचेच्या माध्यमातून उद्भवू शकतो. नंतर दुर्लक्ष झाल्यास गतीने दुसर्यात भागातही हा संसर्ग पसरु शकतो. 

वेळीच निदान आणि उपचार केल्यामुळे या आजारामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळता येतात. यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग काळात उपचारादरम्यान स्टेरॉईडचा वापर आवश्यक तेवढाच गरजेचा आहे. अतिरिक्त वापर टाळणे अत्यावश्यक. प्रतिजैविकांचा (अँटीबायोटिक्स) तारतम्याने वापर आवश्यक आहे. या आजारावरील उपचारासाठी अँटी फंगल ट्रीटमेंटची गरज असेल तर सर्जरी करुन बाधित झालेला भाग काढला  जातो. यासाठी दंत शल्यचिकित्सक, ओरल आणि मॅकझिलोफ़ेशियल सर्जन, कान-नाक-घसा तज्ञ, न्यूरोसर्जन व फिजिशियन यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

‘म्युकरमायकोसीस’ आजाराची लक्षणे

म्युकरमायकोसीस आजारात व्यक्तीच्या श्वसनयंत्रणेस किंवा त्वचेस संसर्ग उद्भवतो. यामध्ये प्रामुख्याने खोकला, ताप येणे, डोकेदुखी, नाक बंद, सायनस वेदना, दातांमधे तीव्र वेदना, दात हलणे, हिरड्यांमधून पस येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, टाळूवर एखादा काळा चटटा येणे, नाकातून पस येणे, डोळ्यांनी कमी दिसणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज येणे किंवा बधीरता येणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, त्वचा काळसर होणे,त्वचेवर मेदयुक्त फोड येणे, त्वचेवर लालसरपणा येणे, शरीराला सूज येणे, अल्सर आदी प्रकारची लक्षणे यामध्ये दिसून येतात. या आजारामुळे प्रसंगी डोळा व जबडा गमवायची वेळसुद्धा येऊ शकते. मेंदूपर्यंत त्याचा संसर्ग पोहोचल्यास अर्धांगवायूचा झटका किंवा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.

‘म्युकरमायकोसीस’चा संसर्ग टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

     म्युकरमायकोसीस हा संक्रमित होणारा आजार नाही. संक्रमित व्यक्तीकडून तो आजार दुसऱ्या व्यक्तीला होवू शकत नाही. या प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्यास, घराबाहेर स्वत:ला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी काम करताना मास्क घातल्यास आणि पूर्ण बरे होईपर्यंत सर्व जखमांवर नियमित मलमपट्टी करीत राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग रोखणे शक्य होईल. उन्हाळ्यात आणि शरद ऋतूतील महिन्यांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण या वातावरणात बुरशीचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतांना कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells