Header Ads

दि. ०९ एप्रिल २०२१ - कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. take proper corona prevention measures - DM

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

  • प्रतिबंधित क्षेत्राविषयी नियमांचे पालन आवश्यक
  • कोरोना बाधिताच्या संपर्कातील चाचणी बंधनकारक

वाशिम, दि. ०९ (जिमाका) : कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, त्यांच्या कोरोना चाचण्या व प्रतिबंधित क्षेत्राविषयी शासनाने दिलेल्या नियमावलीचे सुद्धा तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे. याकरिता तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई झाल्यास संबंधितांविरुद्ध नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिला. दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, ९ एप्रिल रोजी तालुकास्तरीय यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व मुख्याधिकारी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना बाधितांचा शोध घेवून त्यांचे विलगीकरण करण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यासाठी नियोजन करावे. तसेच कोरोना बाधित व्यक्तींच्या नजीकच्या संपर्कातील, त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी होईल, याची दक्षता घ्यावी. शासनाच्या नियमावलीनुसार प्रतिबंधित क्षेत्रांची अंमलबजावणी तंतोतंत होणे आवश्यक आहे, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची कोरोना चाचणी करणे, गृह विलगीकरणास परवानगी दिलेल्या व्यक्तींकडून नियमांचे पालन होत असल्याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. बाधिताच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची चाचणी करण्यासोबतच त्याच्या हातावर सुद्धा ‘हाय रिस्क कॉन्ट्रॅक्ट’चा शिक्का मारावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण व चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी तालुकास्तरावर मनुष्यबळाचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. तसेच या संदर्भातील डाटा एन्ट्री सुध्दा त्याच दिवशी पूर्ण करावी. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नियमावलीची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ज्या आस्थापना, दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे, तेथे कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन होणे बंधनकारक आहे. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी भाजीपाला व फळे विक्रेत्यांना विकेंद्रित स्वरुपात जागा उपलब्ध करून द्यावी. कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक व योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी. याबाबीकडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजाने संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलावी लागतील, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी सांगितले.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या होण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचे कठोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर संबंधित तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने सातत्याने आढावा घेवून कोविड केअर सेंटरमध्ये मुलभूत सुविधा अखंडितपणे सुरु राहतील, याची खबरदारी घ्यावी.

No comments

Powered by Blogger.