Header Ads

वाशिम दि ३० - ‘ऑक्सिजन प्लान्ट’ उभारणीच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई Give top priority to the construction of ‘Oxygen Plant’

‘ऑक्सिजन प्लान्ट’ उभारणीच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई

  • जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन तीन प्लान्टची उभारणी
  • ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्याच्या सूचना

    वाशिम, दि. ३० (जिमाका) : कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात २ आणि कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात १ ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्याची कार्यवाही सुरु केली आहे. या कामाला सर्वोच्च प्राधान्य देवून सदर काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी संबंधित संस्थेकडे सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ३० एप्रिल रोजी झालेल्या कोरोना संसर्ग विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.

    यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुनिता आमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनची जिल्ह्याची गरज सध्या पूर्ण होत असली तरी आगामी काळात कोरोना संसर्गाची तिसरी, चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३ ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्यात येणार असून त्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक प्लान्ट दर मिनिटाला हवेतून ६०० लिटर ऑक्सिजन निर्माण करेल. त्यामुळे जिल्ह्याची ऑक्सिजनची बहुतांशी गरज पूर्ण होण्यास मदत होईल. या प्लान्टची उभारणी १५ दिवसांत पूर्ण व्हावी, या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात सध्या ६२८ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. भविष्यातील रुग्णवाढ लक्षात घेवून यामध्ये आणखी वाढ करणे आवश्यक आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आणखी ७५ व कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणखी ५० ऑक्सिजन बेड वाढविण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

    प्रत्येक बाधित व्यक्तीच्या मागे त्याच्या संपर्कातील २० लोकांची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी आरटीपीसीआर प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याचे काम सुरु असून हे काम सुद्धा तातडीने पूर्ण करावे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होवू नये, तसेच गरजू रुग्णाला हे इंजेक्शन मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून आवश्यक उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना सध्या कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत असून ही मोहीम आणखी गतिमान करावी. विशेषतः ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना विहित कालावधीत लसीचा दुसरा डोस मिळेल, यासाठी नियोजन करावे, असे पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले. जिल्ह्यातील संचारबंदी अंमलबजावणीचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात दर आठवड्याला १६ ते २० हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना बाधितांवर उपचारासाठी सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ८९० बेड्स आहेत. तसेच ६२८ ऑक्सिजन बेड उपलब्ध असून ५१ एनआयव्ही, ३२ बायपॅप सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत. तसेच वाशिम स्त्री रुग्णालय व कारंजा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्याचे नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत यांनी ग्रामीण भागातील कोरोना चाचण्या, लसीकरण मोहीम याविषयी माहिती दिली.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी जिल्ह्यात संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, तपासणी नाके तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाने केलेल्या कारवायांची माहिती दिली.

No comments

Powered by Blogger.