Header Ads

दि १२ एप्रिल २०२१ - कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास त्वरित चाचणी करावी - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. - Get tested immediately if you have symptoms of corona infection

कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास त्वरित चाचणी करावी - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

  • लवकर निदान, उपचाराने रुग्ण बरे होण्याची शक्यता अधिक
  • तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन

वाशिम, दि. १२ (जिमाका) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेवून त्यांचे विलगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. जेणेकरून या बाधितांपासून त्यांच्या कुटुंबातील व समाजातील इतर व्यक्तींना होणारा संसर्ग टाळता येईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना चाचणीसाठी सहकार्य करावे. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्यास मनात कोणतीही भीती न बाळगता त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

सर्दी, ताप, घसादुखी, अंगदुखी, खोकला ही कोरोना विषाणू संसर्गाची प्रमुख लक्षणे आहेत. यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास अधिक वेळ न घेता नागरिकांनी त्वरित नजीकच्या कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना विषाणू संसर्गाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, संसर्गाचे निदान होण्यास विलंब होवून वेळेवर उपचार सुरु न झाल्यास रुग्ण दगावण्याचा धोका असतो. गेल्या काही दिवसात झालेल्या मृत्यूंपैकी बहुतांशी मृत्यू हे या कारणानेच झाले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचे वेळेवर निदान व उपचार होण्यासाठी नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसल्यास मनात कोणतीही भीती न बाळगता त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीस अडथळा आणल्यास कठोर कारवाई

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना सुरु आहेत. या अंतर्गत प्रतिबंधित क्षेत्रांची निर्मिती, नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत मोहीम स्वरुपात कार्यवाही सुरु आहे. यासाठी गावामध्ये, आपल्या भागामध्ये येणाऱ्या आरोग्य पथकांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. या कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा असहकार्य करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या स्वतःच्या, परिवाराच्या तसेच समाजाच्या सुरक्षेसाठी सर्व नागरिकांनी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.