Header Ads

रेमडेसिवीर इंजेक्शनचा अतिरेकी वापर टाळायला हवा ! - Extreme use of remedivir injection should be avoided!

रेमडेसिवीर इंजेक्शनचा अतिरेकी वापर टाळायला हवा !

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत; ‘आयसीएमआर’च्या दिशानिर्देशांचे पालन गरजेचे

वाशिम, दि. १३ (जिमाका) : कोरोना बाधितांवर उपचार करताना वापरल्या जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्या रुग्णालाही मिळावे, यासाठी नातेवाईकांचा आग्रह असतो. त्यासाठी अनेकदा डॉक्टरांकडे याबाबत आग्रह केला जात आहे. त्यामुळे गरज नसताना किंवा अतिरेकी प्रमाणात या इंजेक्शनचा वापर होतो. परिणामी, गरजू रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण होतात. हे टाळण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. यासाठी ‘आयसीएमआर’ व राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. राठोड याच्या मतानुसार, रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना बाधितांवरील उपचारासाठी  सहाय्यभूत ठरत असले तरी ते कोणत्या रुग्णांना द्यावे, याबाबत जागतिक आरोग्य संघटना तसेच  ‘आयसीएमआर’ व राज्यस्तरीय टास्क फोर्सने काही दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार ‘आरटीपीसीआर’ चाचणीत कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा कमी आढळल्यास त्याची आरोग्यस्थिती पाहून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा निर्णय संबंधित कोविड रुग्णालयाचे डॉक्टर घेवू शकतात. पण कोरोना चाचणी न करता केवळ ‘एचआरसीटी’ चाचणीच्या आधारे किंवा ओरोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या रुग्णांना सुद्धा हे इंजेक्शन देण्याचा आग्रह नातेवाईकांकडून होतो, हे पूर्णतः चुकीचे आहे. तसेच ज्या बाधिताला कोरोनाची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, मात्र शरीरातील ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा अधिक आहे, अशा रुग्णांना सुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे नातेवाईकांनी तसेच संबंधित डॉक्टरांनी सुद्धा ‘आयसीएमआर’च्या दिशानिर्देशाचे पालन करूनच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करणे बंधनकारक आहे, असे डॉ. राठोड म्हणाले.

डॉ. आहेर म्हणतात, राज्यस्तरीय टास्क फोर्स यांनी ‘आयसीएमआर’च्या दिशानिर्देशानुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केव्हा करावा, याविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांच्या रक्ताची तपासणी  (जसे की, डी डायमर, सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन, एलडीएच, सिरम फेरिटीन) करून, तसेच ‘एचआरसीटी’ चाचणीचे गुणांकन (स्कोर) ९ पेक्षा अधिक असल्यास सदर रुग्णास रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याबाबत सुचविण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांवरील उपचारासाठी या इंजेक्शनचा उपयोग होत नसल्याचे अनके तज्ज्ञांचे मत आहे. शरीरातील ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी असल्यास या सर्व बाबींचा विचार करून उपचार करणारे डॉक्टर कोणती औषधे केव्हा द्यायची याबाबतचा निर्णय घेत असतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्लाने व मार्गदर्शक सूचनांनुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर योग्य रुग्णांवर करण्यात यावा. या इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळणे आवश्यक आहे. जेणेकरून गरजू रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध होवू शकेल, असे डॉ. आहेर म्हणाले.

डॉ. कावरखे यांनी सांगितले की, रेमडेसिवीर इंजेक्शन हे कोरोना बाधितांवरील उपचाराचा एक भाग आहे. या इंजेक्शनचा वापर कधी करायचा, याविषयी ‘आयसीएमआर’ने दिशानिर्देश जारी केले असून त्यानुसार कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर इंजेक्शनच्या वापराविषयी निर्णय घेत असतात. मात्र, कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांवर दबाव टाकून या इंजेक्शनचा वापर करण्याचा आग्रह करतात. रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला दिले म्हणजे आपला रुग्ण बरा होईल, असा त्यांचा समज असतो. पण रेमडेसिवीर इंजेक्शन हे कोरोना संसर्गावरील रामबाण उपाय नाही, तो केवळ या उपचाराचा एक भाग आहे. त्यामुळे हे इंजेक्शन मिळाले तरच आपला रुग्ण बरा होईल, असा विचार करणे चुकीचे आहे, असे डॉ. कावरखे यांनी सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला कधी द्यावे, याबाबतचा निर्णय संबंधित डॉक्टरांवर सोपवावा. कोणीही या इंजेक्शनच्या अनावश्यक वापराचा आग्रह करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

No comments

Powered by Blogger.