Header Ads

दि ०९ एप्रिल २०२१ - वाशिम, पार्डी टकमोर येथील लसीकरण केंद्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी - Central team inspects vaccination center at Washim, Pardi Takmore

वाशिम, पार्डी टकमोर येथील लसीकरण केंद्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी

वाशिम, दि. ०९ (जिमाका) : वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक जिल्हयात आले असून या पथकाचे सदस्य तथा दिल्ली येथील राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे डॉ. पुनीत अरोरा यांनी आज, ९ एप्रिल रोजी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्र, जुन्या वाशिम शहरातील नागरी आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पार्डी टकमोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील लसीकरण केंद्राला भेट दिली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिपक मोरे, पार्डी टकमोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्राला डॉ. अरोरा यांनी भेट देवून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, लसीकरण करणारे कर्मचारी आणि लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींशी संवाद साधला. लसीकरणासाठी कशाप्रकारे नोंदणी करण्यात येते, लसीकरण कशा पध्दतीने करण्यात येते, याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. लसीकरण केंद्रावर प्रत्येक कर्मचाऱ्याने सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे आणि हात वारंवार स्वच्छ धुवावे, अशा सूचना डॉ. अरोरा यांनी यावेळी केल्या.

लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरीकांशी संवाद साधला. लसीकरणाची माहिती कोणी दिली याबाबतची माहिती डॉ. अरोरा यांनी जाणून घेतली. लसीकरण केल्यानंतर निरीक्षण कक्षात बसलेल्या व्यक्तींशी चर्चा करुन लसीकरणानंतर त्यांना काही त्रास होत आहे काय, याबाबतची माहिती जाणून घेतली. आपल्या वयोगटातील इतर व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन डॉ. अरोरा यांनी लस घेतलेल्या व्यक्तींना केले. लसीकरण केंद्रात योग्य पध्दतीने आणि लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन लसीकरण करण्यात येत असल्याबद्दल डॉ. अरोरा यांनी समाधान व्यक्त केले.

जून्या वाशिम शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटी प्रसंगी डॉ. अरोरा यांनी लसीकरणासाठी आलेल्या व्यक्ती व लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या नोंदीचे रजिस्टरची तपासणी केली.

वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. अरोरा यांनी भेट दिली. या केंद्रात कोरोना लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींशी तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. लसीकरणासाठी आलेल्या एका महिलेशी संवाद साधून लसीकरणाची माहिती आपणास कोणी दिली याबाबत विचारणा केली. त्यांचा मोबाईल क्रमांक डाटा एन्ट्री ऑपरेटरने संगणकामध्ये समाविष्ठ केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला संदेश त्यांनी बघितला. प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तत येणाऱ्या गावातील सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोरोना बाधित व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीचे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन गृह विलगीकरण करण्यात येते. एखादया व्यक्तीची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास त्या व्यक्तीला ताबडतोब पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या गावातील व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी यावेळी डॉ. अरोरा यांना दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.