Header Ads

दि. ०९ मार्च २०२१ - प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Strictly implement preventive measures - Collector Shanmugarajan S.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे आवश्यक
  • रुग्ण संख्या अधिक असलेल्या क्षेत्रात सर्वांची चाचणी करा
  • कोरोना लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करा

वाशिम, दि. ०९ (जिमाका) :  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्यासोबतच बाधिताच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेवून त्याची कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणालीद्वारे आज, ९ मार्च आयोजित सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर या बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यापुढे शहरातील ज्या भागात अथवा गावात जास्त रुग्ण आढळतील, त्या भागातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करावी. तसेच ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण वाढवून प्रत्येक रूग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान २० ते ३० व्यक्तींचा शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, अशा गावांमध्ये घरोघरी जावून आरोग्य तपासणी करावी. यामध्ये ज्या लोकांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून येतील, त्यांची कोरोना चाचणी करावी. जेणेकरून संसर्ग झालेल्या व्यक्तींचा लवकर शोध घेवून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल.

कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ६० वर्षांवरील नागरिक तसेच ४५ ते ६० वर्षे वयोगटातील अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जात आहे. गेल्या काही दिवसात कोरोनामुळे झालेले मृत्यू हे ६० वर्षांवरील वयोगटातील तसेच अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचे आहेत. त्यामुळे या गटातील जास्तीत जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देवून त्यांना या आजारापासून सुरक्षा देणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांनी या व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करून येत्या एका महिन्यात जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

कोरोना सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करा

कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात मास्क, सॅनिटायझरचा वापर  व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या नियमांचे पालन होणे अतिशय गरजेचे आहे. मात्र, तरीही शहरी व ग्रामीण भागात काही दुकानदार, आस्थापनाधारक, नागरिक यांच्याकडून कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करावी. त्यासाठी तपासणी पथके स्थापन करून याबाबतची कार्यवाही गतिमान करावी. शहरात अथवा ग्रामीण भागात नियमांचे उल्लंघन होवूनही कारवाई न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिला.

‘होम क्वारंटाईन’ नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करा : जिल्हाधिकारी

कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तींना त्यांची आरोग्य स्थिती व घरात स्वतंत्र राहण्याची सुविधा पाहून होम क्वारंटाईन होण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र, होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमांचे पालन होते का, या व्यक्ती घराबाहेर पडत नसल्याची खात्री करण्यासाठी ग्रामीण व शहरी स्वतंत्र पथके स्थापन करावीत. या पथकांनी अचानक गृहभेटी देवून सदर रुग्ण होम क्वारंटाईनचे नियम पाळत असल्याची खात्री करावी. नियमांचे उल्लंघन करून सदर व्यक्ती घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाना मनाई करण्यात आली आहे. तरीही लग्न अथवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने गर्दी होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी. शहरी व ग्रामीण भागातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक असून संबंधित यंत्रणांनी यासाठी संबंधित गावे, शहरात विशेष कॅम्पचे आयोजन करावे. आतापासूनच कोरोना चाचणी संख्या वाढविली तर कोरोना रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.

No comments

Powered by Blogger.