Header Ads

दि.19 मार्च - वाशिम जिल्ह्यात ४० केंद्रांवर कोरोना लसीकरण 40 corona vaccination center in washim district

वाशिम जिल्ह्यात ४० केंद्रांवर कोरोना लसीकरण

ज्येष्ठ नागरिक, दीर्घ आजार असणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर निशुल्क लस उपलब्ध

वाशिम, दि. १९ : जिल्ह्यातील ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील मधुमेह, ह्रदयरोग, रक्तदाब यासारखे दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यास १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ४० लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु असून जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींनी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक प्रमाण हे ६० वर्षांवरील व्यक्ती तसेच दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींचे आहे. त्यामुळे या गटातील व्यक्तींचा कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी त्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोना लसीचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने घेणे आवश्यक आहे. त्यानंतर १४ दिवसानंतर शहरीरात अँटिबॉडीज तयार होतात. ही लस घेतल्यानंतर कोणताही गंभीर दुष्परिणाम जाणवत नसून काही जणांमध्ये सौम्य ताप, अंगदुखी यासारखी लक्षणे दिसू लागतात. कोणतीही लस घेतल्यानंतर असे होणे साहजिक आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोरोना लसीकरण केंद्रामध्ये लस दिल्यानंतर अर्धा तास निगराणीखाली ठेवले जाते. याकाळात मानसिक किंवा शारीरिक अस्वस्थता अथवा वेदना झाल्यास कक्षातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना सांगावे.

कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येताना आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, जॉब कार्ड, पासपोर्ट, पेन्शनची कागदपत्रे, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक अथवा पोस्ट कार्यालयातून जारी केलेले पासबुक, केंद्र अथवा राज्य शासन किंवा पीएसयु, पब्लिक लिमिटेड कंपनीने अदा केलेले सर्विस ओळखपत्र सोबत घेऊन यावे. दीर्घ आजार असणाऱ्या व्यक्तींनी सदर आजाराविषयी सुरु असलेल्या उपचाराबाबतची कागदपत्रे सोबत आणावीत.

सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस निशुल्क उपलब्ध असून खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरणासाठी प्रत्येक डोससाठी २५० रुपये रक्कम आकारली जात आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित असून पात्र व्यक्तींनी लसीकरण विषयक अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्र

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कारंजा उपजिल्हा रुग्णालय, वाशिम सामान्य रुग्णालय येथे शासकीय लसीकरण केंद्र सुरु आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत लसीकरण सुरु आहे. तसेच सर्व ग्रामीण रुग्णालये, कारंजा उपजिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रांवर रविवारी सुद्धा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येत आहे. वाशिम येथील बालाजी हॉस्पिटल प्रसूतिगृह आणि बाल रुग्णालय, माँ गंगा मेमोरियल बाहेती हॉस्पिटल, बिबेकर हॉस्पिटल, डॉ. व्होरा हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल, देवळे हॉस्पिटल, बालाजी बाल रुग्णालय येथे खाजगी लसीकरण केंद्र सुरु आहे.

No comments

Powered by Blogger.