Header Ads

वाशिम दि.२६ फेब्रु - देगाव येथील शाळेतील बाधित विद्यार्थ्यांची दररोज तीन वेळा आरोग्य तपासणी


देगाव येथील शाळेतील बाधित विद्यार्थ्यांची दररोज तीन वेळा आरोग्य तपासणी

  • कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत
  • जिल्हाधिकाऱ्यांनी केली आरोग्य सुविधांची पाहणी
  • पालकांसोबत संपर्क साधण्यासाठी व्हिडीओ कॉलची सुविधा

वाशिम, दि. २६ (जिमाका) : रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे. या शाळेतील कोरोना बाधित विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाच्या पथकाकडून दिवसातून तीन वेळा आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा शाळेला भेट देवून येथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील २२९ विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २४ फेब्रुवारी रोजी तातडीने शाळेला भेट देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच या विद्यार्थ्यांना योग्य उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी दोन डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके २४ तास शाळेमध्ये तैनात करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले होते. त्याचबरोबर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. आरोग्य विभागाने तातडीने या सूचनांची अंमलबजावणी करून या शाळेमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच या शाळेचे तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. येथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी पुन्हा शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सद्यस्थिती जाणून घेतली.

व्हिडीओ कॉलिंगद्वारे विद्यार्थ्यांचा पालकांशी संवाद

बाधित आढळलेले विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५, बुलडाणा जिल्ह्यातील ३, अकोला जिल्ह्यातील १, हिंगोली जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश असून संबंधित जिल्हा प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गावातील तलाठी, ग्रामसेवक यांचे सहाय्य घेवून विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क करून दिला जात आहे. त्यामुळे पालकांच्या मनात  विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत असलेला संभ्रम, भीती दूर होण्यास मदत होणार आहे.

No comments

Powered by Blogger.