Header Ads

जिल्ह्याबाहेर प्रवास करून आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

जिल्ह्याबाहेर प्रवास करून आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

वाशिम (जिमाका) दि. २२ : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधितांचा लवकर शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बाधितांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांची वाढ पाहता गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर प्रवास केलेल्या, विशेषतः ज्या भागामध्ये संसर्ग अधिक वाढला आहे, अशा भागात प्रवास करून आलेल्या सर्व नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांवर लवकर उपचार सुरू होतील व त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे, अशा जिल्ह्यात प्रवास  करून आलेल्या किंवा वास्तव्य करून आलेल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःहून आपली कोरोना चाचणी करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

लक्षणे असल्यास तातडीने चाचणी करून घ्या

कोरोना संसर्गाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. याउलट निदान व उपचारास विलंब झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, घशामध्ये खवखवणे यासारखी कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे. तसेच सर्वांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना चाचणीची सुविधा

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, रिसोड तालुक्यातील सवड येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह व कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून याठिकाणी सुद्धा कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे.

No comments

Powered by Blogger.