Header Ads

‘बर्ड फ्ल्यू’बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरू नका, काळजी घ्या ! - जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे आवाहन

‘बर्ड फ्ल्यू’बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरू नका, काळजी घ्या !

जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे आवाहन
काय करावे, काय करू नये याविषयी मार्गदर्शन

      वाशिम, दि. १३ : राज्यात काही ठिकाणी ‘बर्ड फ्ल्यू’चे संक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. आपल्या जिल्ह्यात अद्याप अशाप्रकारची कोणतीही घटना आढळून आलेली नाही. त्यामुळे ‘बर्ड फ्ल्यू’बाबत समाज माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. या अफवांमुळे घाबरून न जाता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी काय करावे, काय करू नये, याविषयी माहिती दिली आहे.

     पोल्ट्री फार्ममधील पक्षी अथवा बदके, कावळे यासारख्या पक्षांची अचानक मोठ्या प्रमाणात मर्तुक आढळल्यास नागरिकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना कळवावे. कुक्कुटपालकांनी कुक्कुटपालन शेड व परिसरात स्वच्छता राखावी, तसेच शेडचे सोडियम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून निर्जंतुकीकरण करावे. पक्षांचे पिंजरे, त्यांना रोज ज्या भांड्यात रोज खाणे दिले जाते, अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छत धुवावीत. एखादा पक्षी मरण पावला तर त्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका. त्याबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना कळवा. पक्षांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि हातमोजे वापरा.

      चिकन व अंडी शिजवून (१०० अंश सेल्सिअस) खा. चिकन स्वच्छ करताना सहसा हातमोजे वापरा. कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका. अर्धवट शिजलेले मांस, चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका. आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येवू नका. पूर्णपणे शिजवलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करतांना पाणी व साबणाने आपले हात वारंवार स्वच्छ धुवा. व्यक्तिगत स्वच्छता परिसर स्वच्छ ठेवा. अधिक माहितीसाठी www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. वानखडे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.