Header Ads

जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरणाचे योग्य नियोजन करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Planning of Kovid-19 vaccination in the district

जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरणाचे योग्य नियोजन करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

जिल्हा कृती दल समितीची सभा संपन्न 

    वाशिम, दि. ०९  : कोविड-१९ या महामारीला जिल्ह्यात प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरणासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

    दि.०८ डिसेम्बर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात कोविड-१९ लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत गठीत जिल्हा कृती दल समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून श्री. षण्मुगराजन एस. बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर. डी. तांगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ए. डी. मानकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक सम्यक मेश्राम, युनिसेफचे डॉ. शैलेश पाटील, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक एस. जी. घुगे, महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी व्ही. बी. शिंदे, आयएमएचे सचिव डॉ. अमित गंडागुळे, स्काऊटचे श्री. गावंडे, संतोष इंगळे, सरिता चव्हाण, श्रीमती लिहितकर यांची उपस्थिती होती.

    जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन एस. म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स त्यानंतर ५० वर्षांवरील व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती यांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची माहिती तातडीने संकलित करावी. कोविड-१९ च्या नियमित लसीकरणासाठी किती कर्मचारी वर्ग लागणार आहे, हे निश्चित करावे, असे सांगून श्री. षण्मुगराजन एस. म्हणाले, सर्व तहसिलदारांना देखील याबाबतची माहिती द्यावी. लसीकरण केल्यानंतर उरलेल्या जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण करताना विशेष काळजी घ्यावी. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेवून उर्वरित टप्प्यांचे योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

    डॉ. आहेर यांनी जिल्ह्यातील कोविड-१९ लसीकरणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची तसेच उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. जिल्ह्यातील लसीकरणासाठी ९४९ व्हॅक्सिन कॅरिअर निश्चित करण्यात आल्याचे सांगितले.

    संगणक सादरीकरणातून कोविड-१९ लसीकरणाबाबतची माहिती डॉ. शैलेश पाटील यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.