Header Ads

लोणी बुद्रुक येथील मुलीचा बालविवाह रोखला - महिला व बाल विकास विभागाची कामगिरी

लोणी बुद्रुक येथील मुलीचा बालविवाह रोखला
महिला व बाल विकास विभागाची कामगिरी

वाशिम, दि. ०२ (जिमाका) : महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे ३० नोव्हेंबर २०२० रोजी रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला. या बालविवाहाबाबतची माहिती अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या समुपदेशनाने सदर बालविवाह रोखला.

बालविवाहाबाबतची माहिती अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी परीविक्षा अधिकारी गणेश ठाकरे यांच्या समन्वयाने जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी एम. चौधरी, सामाजिक कार्यकर्ता अनंता पी. इंगळे, डाटा एन्ट्री ऑपरेटर अजय जी. यादव, क्षेत्रीय कार्यकर्ता रामेश्वर पी. वाळले तसेच रिसोड तालुका संरक्षण अधिकारी गोपाल एस. घुगे, यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याचे आदेश दिले.

सदर पथकाने रिसोड पोलीस स्टेशनचे गजानन ए. वानखेडे, पोलीस पाटील अंबादास दीक्षे यांच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले. यावेळी उपस्थितांमध्ये कोरोना आजरा संबंधी काळजी घेवून कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात अशाप्रकारे बालविवाह होत असल्यास ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.