Header Ads

Voter list special revision from 17 Nov. - १७ नोव्हेंबर पासून मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

Voter list special revision from 17 Nov.

१७ नोव्हेंबर पासून मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्मुगराजन एस. यांची माहिती
वाशिम, दि. १५ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांचा १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा  विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार १७ नोव्हेंबर २०२० रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामुळे मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली.

प्रारुप मतदार याद्या मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नसतील, असे मतदार तसेच ज्यांचे वय १ जानेवारी २०२१ ला अठरा वर्ष पूर्ण होतील, अशा सर्व पात्र व्यक्तींना  नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करु शकतील. तसेच या याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा  करावयाच्या असल्यासही दावे व हरकती १५ डिसेंबर २०२० पर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच संबंधित बीएलओ यांच्याकडे देखील अर्ज सादर करता येणार आहेत.

दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत ५ जानेवारी २०२१ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई आदी १४ जानेवारी २०२१ पर्यंत करुन १५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान दोन शनिवार आणि दोन रविवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी विशेष मोहिमेचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजनही करण्यात येणार आहे व त्या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ स्वतः हजर राहून अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही करणार आहेत. प्रारूप  मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र कायमस्वरूपी  स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.