Header Ads

Seventh Economic Census -The District Collector reviewed the work - सातवी आर्थिक गणना कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 
सातवी आर्थिक गणना कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
 जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा

    वाशिम, दि. २५ (जिमाका) : केंद्र शासनामार्फत राष्ट्रव्यापी (Seventh Economic Census) सातवी आर्थिक गणना घेण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात सुरु असलेल्या कार्यवाहीचा आढावा (Washim District Collector) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत घेतला. तसेच आर्थिक गणनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

    यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीमती कि. पु. उंद्रे, वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक मोरे, ‘सीएससी’चे जिल्हा व्यवस्थापक महावीर सावळे यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम सामुहिक सेवा केंद्रांमार्फत नेमण्यात आलेल्या प्रगणकांकडून करण्यात येत आहे. हे प्रगणक प्रत्येक उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष उद्योगास, कुटुंबाला भेट देवून मोबाईल अॅपच्या सहाय्याने माहिती गोळा करीत आहेत.

    यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील आर्थिक गणनेचे काम विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. याकरिता सर्व प्रगणकांची सभा घेवून सर्वेक्षणाच्या कामाला गती द्यावी. सर्वेक्षणादरम्यान कोविड-१९ प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. काही अडचणी असतील तर स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधावा. विहित मुदतीच्या आतच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून संकलित करण्यात आलेल्या माहितीची तपासणी करण्यात यावी. संकलित केली जाणारी संपूर्ण माहिती अचूक असावी, याची सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

    प्रारंभी श्रीमती उंद्रे यांनी आर्थिक गणनेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारी विषयी माहिती दिली.

No comments

Powered by Blogger.