Header Ads

Restrictive order at exam center. - दहावी, बारावी पुरवणी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

दहावी, बारावी पुरवणी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

वाशिम, दि. १५ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) २२ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२० या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२० या कालावधीत होत आहे. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रांभोवती कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी इयत्ता १२ वी परीक्षा होणाऱ्या सर्व परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात २२ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२० (सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत तसेच इयत्ता १० वी परीक्षा केंद्रांच्या परिसरात २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२० (सुट्टीचे दिवस वगळून) या काळात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालया मार्फत कळविण्यात आले आहे.

परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले असून परीक्षा केंद्रांवर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर इसमांना प्रवेशास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर २०० मीटरचे आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील. एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरातील टेलिफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., झेरॉक्स, फॅक्स, ध्वनिक्षेपके इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडीओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर व इतर प्रसारमाध्यमे वापरण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.