Header Ads

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Emphasis on public awareness for control of pink bond larvae

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

    वाशिम, दि. ०९ (जिमाका) : वातावरणातील बदलामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत कृषि विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा. तसेच कृषि सहाय्यकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या गुलाबी बोंड अळी नियंत्रणविषयक सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा कृषि विकास अधिकारी विकास बंडगर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश डावरे यांच्यासह तालुका कृषि अधिकारी, बियाणे विक्रेते संघटना आणि खते व कीटकनाशक विक्रेता संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, सध्याचे वातावरण गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी पोषक आहे. त्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. तसेच पुढील हंगामात सुद्धा या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेवून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकरिता सर्व तहसीलदार व तालुका कृषि अधिकारी यांनी तालुकास्तरावर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून नियोजन करावे.

पुढील हंगामात कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार कृषि विद्यापीठाचा सल्ला, शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना विविध माध्यमांतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी कापूस बियाणे उत्पादक कंपन्या, जिनिंग प्रोसेसिंग मिल, कीटकनाशक व रासायनिक खतांच्या कंपन्यांचे सुद्धा सहकार्य घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. तोटावार व शास्त्रज्ञ डॉ. डावरे यांनी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम, गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे होणारे नुकसान, प्रादुर्भावाची कारणे याविषयी माहिती दिली. तसेच या अळीच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

No comments

Powered by Blogger.