Header Ads

Appeal to take advantage of the schemes of MSOBCFDC - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


Appeal to take advantage of the schemes of MSOBCFDC

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०२ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा (Maharashtra State Other Backward Classes Finance and Development Corporation) मार्फत इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) लाभार्थ्यांसाठी ४ कर्ज योजना राबविल्या जातात. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत २० टक्के बीज भांडवल योजना राबवली जाते. यामध्ये ५ लक्ष रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, त्यामध्ये बँकेचा सहभाग ७५ टक्के, महामंडळाचा सहभाग २० टक्के व लाभार्थ्याचा सहभाग ५ टक्के असतो. या कर्जाचा परतफेडीचा कालावधी ५ वर्षे आहे. महामंडळाच्या थेट कर्ज योजनेअंतर्गत १ लक्ष रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, परतफेडीचा कालावधी ४ वर्षे असतो. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी १० लक्ष रुपये इतकी कर्ज मर्यादा आहे, तर गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये पर्यंत कर्ज मर्यादा आहे. या दोन्ही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा १८ ते ५० वर्षे वयोगटातील असावा. उत्पन्नाच्या दाखल्यासोबत लाभार्थी प्रगत गटात मोडत नसल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमापात्रांच्या साक्षांकित प्रती, जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, सातबारा उतारा, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, २ जमीनदार हमीपत्र अथवा गहाणखत सादर करणे आवश्यक आहे.

 स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतिज्ञापत्र, तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असलेले परवाने, लायसन्स, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री इत्यादीचे दरपत्रक सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.