Header Ads

सूक्ष्म नियोजन करून क्षय व कुष्ठ रुग्णांचा शोध घ्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे निर्देश

 

Tuberculosis and leprosy patients should be traced by meticulous planning

सूक्ष्म नियोजन करून क्षय व कुष्ठ रुग्णांचा शोध घ्यावा 

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे निर्देश 

संयुक्त क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण शोध अभियान समिती सभा

वाशिम, दि. २७ : जिल्ह्यात क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी झाले पाहिजे. अशा रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेवून त्यांच्यावर औषधोपचार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज, २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या संयुक्त सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियानविषयक जिल्हा समन्वय समितीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अंबादास मानकर, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे डॉ. देशमुख, जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश परभणकर, क्षयरोग कार्यालयाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लोनसुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ज्या भागात कुष्ठरुग्णांची संख्या अधिक आहे, त्या परिसरात शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून रुग्णांचा शोध घ्यावा. तसेच या भागांमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कशामुळे अधिक आहे, याच्या कारणांचा शोध घ्यावा. तसेच इतरही भागातील कुष्ठरुग्णांचा शोध घेवून त्यांच्यावर योग्य उपचार होतील, याची दक्षता घ्यावी.

क्षयरुग्ण शोध मोहिमेंतर्गत आतापर्यंत शोधण्यात आलेल्या क्षयरुग्णांवर सुरु असलेल्या औषधोपचाराची माहिती प्रत्येक तीन महिन्याने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अद्ययावत करावी. या रुगांच्या उपचारात कोणत्याही कारणाने खंड पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. या रुग्णांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करावा. जेणेकरून औषधोपचार अथवा इतर कोणत्याही अडचणी प्रसंगी रुग्ण आरोग्य विभागाशी संपर्क साधू शकतील, असेही जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी सांगितले.

No comments

Powered by Blogger.