Header Ads

02 October - Washim District News Mission Begin - ‘मिशन बिगेन’ अंतर्गत नवीन नियमावली लागू

Washim District DM Collector IAS Hrushikesh Modak

02 October Washim District News Mission Begin
‘मिशन बिगेन’ अंतर्गत नवीन नियमावली लागू
जिल्ह्यात आस्थापना, दुकानांच्या वेळेत बदल नाही
५ ऑक्टोबर पासून हॉटेल, बार सुरु होणार

वाशिम, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देवून १ ऑक्टोबरपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली असून ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ही नियामवली लागू राहणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा पूर्वीप्रमाणेच सांयकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. तसेच दवाखाने (पशुवैद्यकीय दवाखान्यांसह), मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहतील. ५ ऑक्टोबर पासून जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असून याकरिता पर्यटन विभागामार्फत स्वतंत्र एसओपी निर्गमित केली जाईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

नगरपालिका, नगरपरिषद हद्दीतील पेट्रोलपंप सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील, हाय-वे वरील पेट्रोलपंप २४ तास सुरु ठेवण्यास मुभा राहील. ६५ वर्षांवरील व्यक्ती, १० वर्षाच्या आतील बालके, गरोदर महिला व इतर गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तींनी आवश्यक तसेच वैद्यकीय करणा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये.

नवीन नियमावलीनुसार जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु राहतील. सिनेमागृह, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, सभागृह, नाट्यगृह बंद राहतील. कोणतेही सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी राहणार आहे.

मास्कचा वापर बंधनकारक; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड

सार्वजनिक ठिकाणी, सरकारी-निमसरकारी व खाजगी कार्यालयात, आस्थापनेत तसेच प्रवासादरम्यान नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर बंधनकारक राहील. मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर न केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध राहील. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. दोन व्यक्तिगत अंतर किमान ६ फुट इतके आवश्यक आहे.

सोशल डिस्टसिंगचे पालन, स्वच्छता आवश्यक

सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ फुटचे अंतर राहील, याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. सर्व आस्थापनांनी सोशल डिस्टसिंगचे पालन होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात, जसे शिफ्टमध्ये काम करणे, कामगारांना मध्य भोजनासाठी वेगवेगळ्या वेळा ठरवून देणे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी. त्यांचा वापर प्रवेशद्वारावर सातत्याने करावा. शक्य असेल तेथे कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक क्षेत्रे आणि व्यापारी संस्था यांनी वर्क फ्रॉम होम करावे.

राज्य शासनाच्या १९ मे २०२० आणि २१ मे २०२० चे आदेश आणि त्यामध्ये राज्य व केंद्र शासनाने केलेल्या सुधारणानुसार निश्चित केलेल्या निकषानुसार यापुढेही प्रतिबंधित क्षेत्र अस्तित्वात राहतील. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना ह्या आदेशात बदल करून किंवा नवीन आदेश पारित करून या आदेशाच्या विसंगत असा कोणताही आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांच्या पूर्वपरवानगीशिवाय पारित करता येणार. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०,  भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.