Header Ads

वाशिम कृषि विभागाचा शेतकऱ्यांना ईशारा - ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा अंदाज

rainfall forecast

वाशिम कृषि विभागाचा शेतकऱ्यांना ईशारा 

११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा अंदाज
पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा

वाशिम, दि. ०६ : हवामान खात्याच्या पूर्वानुमानानुसार विदर्भात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले सोयाबीन, खरीप ज्वारी व कापसाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक कापणीस तयार झाले असून काही ठिकाणी कापणी व मळणीचे काम चालू आहे. बऱ्याच शेतावर कापणी करून सुखवणी करिता छोटे ढीग केलेले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेले पीक योग्य ठिकाणी जमा करून मळणी करून घ्यावी, पिकाचे पावसापासून होणारे नुकसान टाळावे. ज्या शेतकऱ्यांना मळणी करणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांनी जमा केलेल्या सोयाबीनची सुडी उंचवट्याच्या ठिकाणी लावून व्यवस्थित ताडपत्रीने झाकून घ्यावी, जेणेकरून सुडीमध्ये पावसाचे पाणी जावून नुकसान होणार नाहीत.

खरीप ज्वारी परिपक्व झाली असल्यास कापणी, मळणी ११ ऑक्टोबर पूर्वी करून घ्यावी, कपाशी पिकाची बोंडे फुटून काही ठिकाणी कापूस तयार झालेला आहे, त्या कापसाची वेचणी करून व्यवस्थित साठवणूक करावी. सलग सोयाबीन क्षेत्रातील कापणी, मळणी पूर्ण झाली असल्यास रब्बी पिकाच्या नियोजनाकरिता वखराच्या पाळ्या देवून शेत तयार करावे. हरभरा पिकाची पेरणी करण्याची घाई ण करता १५ ऑक्टोबर नंतर पेरणी करावी. पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.