Header Ads

washim district news - रविवारी वाशिम शहरातील सात उपकेंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा

रविवारी वाशिम शहरातील सात उपकेंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा

परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार 

वाशिम, दि. ०६ (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०,  रविवार, ११ ऑक्टोबर २०२० रोजी वाशिम शहरातील सात परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते सायं. ५ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या सातही परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय या सात उपकेंद्रांवर होत आहे. 

या सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. उपकेंद्रावर १०० मीटरचे आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील. परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, ध्वनीक्षेप इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

परीक्षा उपकेंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडीओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, कॉम्प्यूटर वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रावर एकाचवेळी चारपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. हा आदेश ११ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते सायं. ७ वाजेपर्यंत कायम राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.