Header Ads

‘पोकरा’ प्रकल्पांतर्गत कामांना गती द्यावी - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. - जिल्ह्यातील १४९ गावांची नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये निवड


 ‘पोकरा’ प्रकल्पांतर्गत कामांना गती द्यावी - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.
जिल्ह्यातील १४९ गावांची नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये निवड
  • प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा
  • पात्र शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना

वाशिम, दि. २९ : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अर्थात ‘पोकरा’ अंतर्गत कामांना गती द्यावी. प्रकल्पासाठी निवडण्यात आलेल्या गावांमधील शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच आजअखेर ग्राम कृषि संजीवनी समिती आणि कृषि सहाय्यकांच्या स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आज, २९ ऑक्टोबर रोजी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित ‘पोकरा’ प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कालिदास तापी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा कृषि विकास अधिकारी श्री. बनसोड, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी यांच्यासह सर्व तालुका कृषि अधिकारी आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील १४९ गावांची Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp Washim नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये निवड झाली आहे. यापैकी सूक्ष्म नियोजन प्रक्रिया पूर्ण होवून प्रकल्प आराखडा मंजूर झालेल्या गावांमधील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. निवड झालेल्या गावांमधील प्रत्येक पात्र शेतकऱ्याची नोंदणी ‘पोकरा’च्या पोर्टलवर होणे आवश्यक असून, या कामाला गती द्यावी. ज्या तालुक्यांमधील नोंदणी कमी आहे, तेथील तालुका कृषि अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून मोहीम स्वरुपात नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. शेतकऱ्यांना स्वतः अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावून सुद्धा आपली नोंदणी करून मागणी नोंदविता येते. संबंधित गावाच्या समूह सहाय्यकांनी यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

शेतकऱ्यांच्या मागणी अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी गावांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ग्राम कृषि संजीवनी समितींची सभा प्रत्येक आठवड्यात घेण्यात यावी. त्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे. ग्राम कृषि संजीवनी समिती आणि कृषि सहाय्यकांच्या स्तरावर शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आजअखेरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज दीपावलीपूर्वी निकाली काढावेत. पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांनी साहित्य खरेदीची कार्यवाही करून अनुदानासाठी अर्ज केल्यास त्यावर त्वरित कार्यवाही करावी. परिपूर्ण असलेले अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी नियोजन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

उपविभागीय कृषि अधिकारी श्री. चौधरी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या सद्यस्थितीविषयी सादरीकरण केले. जिल्ह्यात या प्रकल्पातून आतापर्यंत ४ कोटी ९४ लक्ष रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये फळबाग लागवड, पाईप, तुषार व ठिबक सिंचन संच, बिजोत्पादन आदी बाबींचा समावेश आहे.

कृषि विभागाच्या ‘यु-ट्यूब’ चॅनेलचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवून कृषि उत्पादनात वाढ करण्यासाठी वाशिम जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने ‘यु-ट्यूब’ चॅनेल सुरु केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना व्हिडीओ स्वरुपात आधुनिक तंत्रज्ञान, पीक पद्धती, कीड रोग नियंत्रण आदी बाबींची माहिती दिली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी’ या यु-ट्यूब चॅनेलला सबस्क्रायब करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी केले.

अवजार बँकेसाठी ट्रॅक्टरचे वितरण

‘पोकरा’ प्रकल्पातून कारंजा लाड येथील ग्रीन्झा शेतकरी उत्पादक कंपनीला ‘अवजारे बँक’साठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामधून कंपनीने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे वितरण आज जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या हस्ते करण्यात आले.

1 comment:

  1. सर माझ नाव प्रमोद उमाळे मी झोडगा रहिवासी मी पोकरा मध्ये सर्व प्रथम अर्ज केला पण आज पर्यंत समती मिळली नाही. कृषिसायक यांना विचारले की ते सांगतात की तुमचे बँकेत आधार लिंक नाही.बँकवले मानतात की तुमचे बँकेत आधार लिंक आहे.मी दुसऱ्या बँकेचं खात काडल तरीपण आज पर्यंत पूर्व समाती मिळाली नाही याचावर काही पर्याय असेल तर सांगा सर

    ReplyDelete

Powered by Blogger.