Header Ads

Divisional Commissioner Piyush Singh gave instructions - कोरोना बाधितांच्या ‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्यावा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

Divisional Commissioner Piyush Singh gave instructions

कोरोना बाधितांच्या ‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्यावा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह
कोरोना संसर्ग विषयक आढावा बैठक

वाशिम, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरीही प्रत्येक कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीची कोरोना विषयक चाचणी होईल, याची दक्षता घ्या. त्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’वर अधिक भर देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १६ ऑक्टोबर रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. मैत्रवार, सहाय्यक निबंधक श्री. गडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, कृषि विभागाचे श्री. मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले, कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरीही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे. बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामधून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची दक्षता घ्या. एका बाधितामागे त्याच्या संपर्कातील सरासरी किमान १५ व्यक्तींची चाचणी होण्यासाठी प्रयत्न करावेत.  जिल्ह्यात सध्या पुरेशा प्रमाणात खाटांची सुविधा उपलब्ध आहे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ सज्ज ठेवा. तसेच ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणामध्ये ज्या व्यक्तींना लक्षणे व अतिजोखमीचे आजार असल्याचे निदान झाले, त्यांची मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना विषयक चाचणी करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून त्यांच्या आरोग्यविषयक नोंदी घेण्यात याव्यात. त्यांच्यामध्ये कोरोना विषयक जनजागृती करावी, अशा सूचनाही श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.

ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी घेतला. तसेच अतिवृष्टी झालेल्या मंडळातील पीक नुकसानीचे पंचमाने त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्जांची माहिती, तसेच पीक कर्ज वितरणाचा आढावाही विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला.


आरटी-पीसीआर प्रयोगशाळेला भेट

जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या विषाणू संशोधन व निदान (आरटी-पीसीआर) प्रयोगशाळेला विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी आज भेट देवून पाहणी केली. या प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यास मदत होणार असून प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने सुरु राहील, याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, डॉ. अनिल कावरखे, डॉ. के. ए. लोणकर, डॉ. बी. एस. हरण, डॉ. लक्ष्मीकांत राठोड उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.