Header Ads

वाशिम जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी २८ ऑक्टोबर पर्यंत आपली माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.


 वाशिम जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी २८ ऑक्टोबर पर्यंत आपली माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.

वाशिम, दि. २७ (जिमाका) :  संभाव्य लसीकरण कृती आराखड्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय व खाजगी व्यावसायिकांची (फ्रंट लाईन हेल्थ वर्कर्स) माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरु आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी विहित नमुन्यातील माहिती संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे. प्रभार स्वीकारल्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी आयोजित पहिल्याच कोरोना विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्वप्रथम मावळते जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी नवे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर, त्यांचा स्टाफ यांची माहिती तातडीने संकलित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय सेवा देणारा एकही व्यक्ती यामधून सुटणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तालुकास्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्वरित कार्यवाही करून माहिती संकलित करावी. जिल्ह्यात सेवा देणाऱ्या सर्व खाजगी डॉक्टरांनी आपली तसेच आपल्याकडे कार्यरत असलेल्या स्टाफची विहिती नमुन्यातील माहिती व ओळखपत्र संबंधित तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे कोणत्याही स्थितीत २८ ऑक्टोबर पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करा

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या तालुक्यामध्ये अधिक कोरोना बाधित सापडले आहेत, त्या तालुक्यातील चाचण्यांची संख्या वाढविण्याचे नियोजन करावे. लोकांशी सतत संपर्क येणारे व्यावसयिक, आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांची सुद्धा कोरोना चाचणी करून घ्यावी. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच जिल्ह्यातील कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थितीची माहिती घेतली.

No comments

Powered by Blogger.