Header Ads

Washim News Today 12 Sept : परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी निदान झाल्याने तीन अत्यावस्थ कोरोना बाधितांवर यशस्वी उपचार

corona virus, covid-19 virus

परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी निदान झाल्याने तीन अत्यावस्थ कोरोना बाधितांवर यशस्वी उपचार
वाशिम कोविड रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

          वाशिम, दि. १२ (जिमाका) : कोरोना संसर्गाचे लवकर निदान झाल्यास रुग्णावर तातडीने उपचार करून त्याला कोरोनामुक्त करणे शक्य आहे, असे सातत्याने सांगितले जात. याचाच प्रत्यय वाशिम जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या तीन रुग्णांना आला आहे. न्यूमोनियामुळे स्वतः श्वासोच्छवास घेण्यास असमर्थ ठरत असलेल्या या रुग्णांना कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वेळेत निदान व योग्य उपचाराने मिळाल्याने हे तीनही रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
          मंगरूळपीर येथील ६५ वर्षीय महिला, वाशिम शहरातील जुनी नगर परिषद परिसरातील ६० वर्षीय पुरुष आणि कारंजा लाड तालुक्यातील शेवती येथील ४५ वर्षीय पुरुष हे त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात तपासणीसाठी आले. चाचण्यांमध्ये ते कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. मात्र, या रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे असल्याने त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. याठिकाणी करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. दोन्ही बाजूला न्युमोनिया असल्याने त्यांची तब्येत खालावली होती.
         स्वतःहून श्वासोच्छवास करतांना पुरेसा ऑक्सिजन शरीरात घेता येत नसल्याने त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झाले होते. त्यामुळे शरीर उपचाराला अपेक्षित प्रतिसाद देत नव्हते. त्यांना मशीनद्वारे कृत्रिमरित्या ऑक्सिजन देवून जिल्हा कोविड रुग्णालयातील वैद्यकीय चमूने उपचार सुरु ठेवले. हळूहळू त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली. मंगरूळपीर येथील ६५ वर्षीय महिला व वाशिम शहरातील ६० वर्षीय पुरुष रुग्णाने कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शेवती येथील व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याच्या इतर आजारावर उपचार सुरु असल्याने त्याला नॉन-कोविड वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. या उपचारानंतर त्यालाही आता रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

लक्षणे दिसताच तातडीने चाचणी करून घ्या 

          या तीनही रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्यास आणखी थोडा जरी विलंब केला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, डॉक्टरांनाही करण्यासारखे फार काही राहिले नसते. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच कोरोना संसर्गाचे निदान झाल्याने आणि योग्य उपचार मिळाल्याने या तीन रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा दुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडाची चव जाणे, अशक्तपणा येणे यासारखी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच नागरिकांनी कोरोना विषयक चाचणी करून घ्यावी. सध्या महामारीचा काळ असून दुखणे अंगावर काढणे आपल्या जीवावरही बेतू शकते, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.

No comments

Powered by Blogger.