Manora News Today : वनमंत्री संजय राठोड यांनी केली नंगारा वस्तू संग्रहालय इमारत बांधकामची पाहणी
Forest Minister Sanjay Rathore inspected the construction work of Nangara Museum building
वनमंत्री संजय राठोड यांनी केली नंगारा वस्तू संग्रहालय इमारत बांधकामची पाहणी
परराज्यातून आलेल्या मान्यवरांकडून संग्रहालय संकल्पनेची प्रशंसा
Manora मानोरा दि. ०४ (जिमाका) : पोहरादेवी येथे श्री संत सेवालाल महाराज मंदिर परिसरातील विकास कामांतर्गत सुरु असलेल्या नंगारारुपी वस्तू संग्रहालय इमारत, खुले सभागृह बांधकामाची आज वनमंत्री संजय राठोड यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच इमारत व इतर बांधकामच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी विधानपरिषद सदस्य दुष्यंत चतुर्वेदी, आंध्र प्रदेशचे माजी मंत्री अमरसिंग तिलावत, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, तहसीलदार सुनील चव्हाण, महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज यांच्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातून आलेले बंजारा समाजातील लोकप्रतिनिधी, अभ्यासक यांची यावेळी उपस्थिती होती.
वनमंत्री श्री. राठोड व विविध राज्यातून आलेल्या मान्यवरांनी नंगारारुपी वस्तू संग्रहालय इमारत बांधकामाची पाहणी केली. यावेळी श्री. जोशी, आर्किटेक्ट हबीब खान यांनी उपस्थितांना वस्तू संग्रहालयातील प्रस्तावित बाबींची माहिती दिली. यावेळी उपस्थित बंजारा समाजातील लोकप्रतिनिधी, अभ्यासक यांनी नंगारारुपी वस्तू संग्रहालय उभारणीच्या संकल्पनेची प्रशंसा करून इमारत बांधकामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच वनमंत्री श्री. राठोड यांनी संग्रहालय उभारणीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन करून राज्य शासनाचे आभार मानले. या संग्रहालयात ठेवण्यात येणाऱ्या वस्तू बंजारा समाजाचा ऐतिहासिक ठेवा असणार असून याकरिता सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शीतलताई राठोड, राजु नाईक, डी. व्ही. नायक (कर्नाटक), डॉ. टी. सी. राठोड, शंकर पवार, डॉ. डी. रामा नायक, रवींद्र पवार, निलेश राठोड, मीलींद पवार, डॉ. बी. डी. चव्हाण, मारोती राठोड, जी. टी. चव्हाण, नवलकिशोर राठोड, डॉ. वर्षा चव्हाण, राजुदास जाधव, अनुप चव्हाण, प्रा. राजेश चव्हाण, देविदास राठोड, संतोष पवार, डॉ. दिनेश राठोड, नेमिचंद चव्हाण, प्रा. संजय चव्हाण, श्रीकांत चव्हाण उपस्थित होते.
Post a Comment