Header Ads

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

Hasan Mushrif Rural Development Minister
Hasan Mushrif Rural Development Minister
Villagers will now get loans on home property in rural areas
ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

       मुंबई (महासंवाद द्वारा) दि. २ - ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणीपत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज घेता येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

          मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनामुळे सध्या सर्वच जण अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आदीजण वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही जण घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून कर्ज घेण्याचा प्रयत्न करतात. पण ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन आदेशान्वये अशा प्रकारे घरांचे मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशामुळे ग्रामस्थांना या पद्धतीने कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या कर्जाच्या बोजाची नोंद होत नसल्यामुळे बँका, पतसंस्था यांच्याकडूनही कर्ज नाकारण्यात येत आहे. त्यामुळे आता हा शासन आदेश रद्द करुन नमुना ८ वर बँका, पतसंस्था आणि इतर अधिकृत वित्तीय संस्थांना कर्जाचा बोजा चढविण्यास अनुमती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना या संस्थांकडून सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.

          मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, केंद्र तसेच राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी स्वामीत्व योजना हाती घेतली असून सर्व गावांची ड्रोनद्वारे मोजणी होऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहेत. पण तोपर्यंत पूर्ववत ग्रामपंचायत नमुना ८ मालकीहक्क दर्शविणारे मालमत्ता कर आकारणी पत्रकावर बँका, पतसंस्था आणि इतर परवानगी असलेल्या अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांचे बोजा नोंद करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने आज घेतला आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
Villagers will now get loans on home property in rural areas

No comments

Powered by Blogger.