Header Ads

Inauguration of Karanja lad SDPO Office : कारंजा लाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन

SDPO office karanja lad Sub Divisional Police Office

पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार - पालकमंत्री शंभूराज देसाई
कारंजा लाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन


          वाशिम, दि. १४ : ऊन, वारा, पावसात रस्त्यावर उभा राहून पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावतात. या पोलिसांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून आगामी काळात पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन गृह (ग्रामीण ), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.  आज, १४ ऑगस्ट रोजी कारंजा लाड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
        यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, नगराध्यक्ष शेषराव ढोके, माजी आमदार प्रकाश डहाके, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, तहसीलदार धीरज मांजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात पोलिसांच्या निवासस्थानांसाठी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यावर शासनाचा भर आहे. कोरोनाचे हे संकट टळल्यानंतर नवीन कामांना मंजुरी देताना पोलिसांच्या निवासस्थानांना प्राधान्य देण्यात येईल. विशेषतः वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील निवासस्थानांच्या कामांसाठी तसेच इतर सुविधा निर्मितीसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कारंजा लाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला नवीन इमारत मिळाल्याने चांगली सुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक जोमाने काम करीत गुन्हेगारांवर वचक निर्माण करून जनतेच्या तक्रारींची सोडवणूक करावी, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.
          आ. पाटणी म्हणाले, जिल्ह्यातील  पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागल्यास त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. कारंजा लाड येथील प्रशासकीय इमारतीचा प्रश्नही मार्गी लावण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
          प्रास्ताविक पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी केले. यावेळी त्यांनी इमारतीच्या कामाविषयी माहिती दिली. इमारत पूर्ण झाल्याने २००४ पासून भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू असलेल्या कार्यालयाला हक्काची इमारत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.