Header Ads

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील वृद्ध उशीरा उपचारार्थ आल्याने मृत्यू : कोरोना निष्पन्न

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील वृद्ध उशीरा उपचारार्थ आल्याने मृत्यू : कोरोना निष्पन्न

लक्षणे दिसताच तपासणी करुन घ्या - जिल्हाधिकारी यांचे आवाहन 

वाशिम (जनता परिषद) दि.१३ - जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरातील पठाणपुरा येथील ६७ वर्षीय व्यक्ती काल, १२ जुलै रोजी दुपारी ३ वा. दरम्यान उपचारासाठी मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात आला. मात्र, ‘सारी’ची तीव्र लक्षणे असल्याने, तसेच तब्येत पूर्णतः खालावली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काल दुपारीच त्याला वाशिम कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले व तातडीने उपचार सुरु करण्यात आले. दरम्यान, त्याची अँटीजेन टेस्ट करण्यात आली असता तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. उपचारा दरम्यान मध्यरात्रीनंतर त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान आज वाशिम कोविड केअर येथे उपचार घेत असलेल्या २ व्यक्ती बर्‍या झाल्यात त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

लक्षणे दिसताच तपासणी करून घेण्याचे आवाहन

मंगरूळपीर (पठाणपुरा) येथील व्यक्ती रुग्णालयात दाखल झाला, त्यावेळीच त्याची तब्येत पूर्णतः खालावलेली होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी पूर्णक्षमतेने त्याचेवर उपचार सुरु केले. मात्र, त्यांना उपचारासाठी पुरेसा अवधी न मिळाल्याने सदर रुग्णाचा मृत्यू झाला.
लवकर निदान व उपचार झाल्यास कोरोना संसर्ग बरा होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, कोरडा खोकला, घसा दुखी, श्वास घेण्यास त्रास, कफ यासारखी लक्षणे जाणवू लागताच त्वरित नजीकच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी अथवा जिल्हा प्रशासनाच्या ८३७९९२९४१५ या व्हॉटस्अप हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी. जेणेकरून कोरोना संसर्गाचे लवकर निदान होवून लवकर उपचार सुरु होतील. संसर्गाची माहिती लपविणे स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा घातक असून लक्षणे दिसताच त्याची माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.