सोयाबीन पीक पिवळे पडणे रोग नाही; उपाययोजना करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
सोयाबीन पीक पिवळे पडणे रोग नाही;
उपाययोजना करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
वाशिम, दि. ०६ (जिमाका) : सोयाबीन पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु सुरवातीच्या काळात जास्त पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून पिके पिवळी पडतात. साध्या पेरणी यंत्राने पेरणी न करता रुंद सारी वरंभा (बी.बी.एफ.) पद्धतीने पेरणी केल्यास पिकामध्ये पाणी साचणार नाही. जास्तीचे पाणी चराद्वारे शेताच्या बाहेर काढून द्यावे. त्यामुळे पीक वापसा परिस्थीत राहून पिकाचे संरक्षण होईल आणि पिकाची वाढ चांगली होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
चुनखडीयुक्त जमिनीत सोयाबीन पिकाची पेरणी केली असल्यास अशा जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण वाढते व जमिनीत उपलब्ध असलेला लोह (फेरस) पिकास उपलब्ध होत नाही. सोयाबीन पिकाची कोवळी पाने संपूर्णतः पिवळी पडतात. हरितद्रव्याचे प्रमाण कमी होऊन प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावून पिकाची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते, यालाच क्लोरॉसिस असे म्हणतात. सोयाबीन पिकाची पाने पिवळी होवू नयेत, यासाठी चुनखडीयुक्त जमिनीत सोयाबीन पेरणीपूर्वी ४० किलो फेरस सल्फेट प्रति हेक्टर जमिनीत मिळावे.
सतत पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून जमिनीमध्ये हवा व पाणी याचे गुणोत्तर विषम होवून पिकांचे मुळाद्वारे श्वसन कमी प्रमाणात होवून पाने पिवळी पडतात. जमिनीमधील जस्त, मॅग्नेशियम, पिकाला उपलब्ध न झाल्यास पाने पिवळी पडतात. त्यामुळे शेतात अतिरिक्त साचलेले पाणी शेताबाहेर काढून शेत वापसा परिस्थितीत राहील, याची काळजी घ्यावी.
जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म जीवाणू, शिष्ट, निमॅटोडस सोयाबीन पिकाच्या मुळावर जगतात. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य शोषण करण्यामध्ये बाधा निर्माण होवून सोयाबीन पिकाची पाने पिवळी होतात, याला येलोफ्लॅश असेही म्हणतात. पिकांवर फवारणी करावयाची झाल्यास फेरस चीलेटेड १ ग्रॅम व झिंक चिलेटेड १ ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आठ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रीयंट ग्रेड II ५०० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तणनाशक फवारणी केल्यामुळे सुद्धा पिकाची पाने पिवळी पडतात. त्यामुळे तणनाशकाचा कमीतकमी वापर करावा. तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास काही कंपन्या तणनाशकासोबत अमोनियम सल्फेट पुरवितात. त्याचा वापर केल्यास पीक, तणनाशकाच्या शॉकमधून लवकर बाहेर पडून जोमदार वाढ होते. लेबल क्लेमनुसारच तणनाशकाचा वापर करावा. वापसा येताच कोळपणी करून शेत भुसभुशीत करावे. अशाप्रकारे पिकांचे व्यवस्थापन केल्यास पिकाची वाढ जोमाने होवून उत्पादनात वाढ होते, असे तोटावार यांनी कळविले आहे.
Post a Comment