१३ ते १५ जुलै ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे नियोजन : वाशिम जिल्ह्यातील उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ निवडीची संधी
१३ ते १५ जुलै ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे नियोजन
वाशिम जिल्ह्यातील उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ निवडीची संधी
ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम, दि. ०६ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने १३ ते १५ जुलै २०२० या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्याचे नियोजन आहे. तरी जिल्ह्यातील उद्योजकांनी, आस्थापना प्रमुखांनी त्यांच्याकडील रिक्त पदानुसार आवश्यक मनुष्यबळाची निवड करण्यासाठी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे जवळपास ३ महिने औद्योगिक आस्थापना, उद्योग-व्यवसाय बंद होते. दरम्यानच्या काळात मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी परतले आहेत. आता टप्प्या-टप्प्याने अनेक उद्योग सुरु होत आहेत. हे उद्योग-व्यवसाय पूर्वीप्रमाणेच पूर्ण कार्यक्षमतेने सुरु होण्यासाठी त्यांना मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १३ ते १५ जुलै २०२० या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्याचे नियोजन आहे.
जिल्ह्यातील उद्योजकांना, आस्थापना प्रमुखांना ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होवून त्यांच्या उद्योग, आस्थापनेसाठी आवश्यक मनुष्यबळाची वयोगटातील, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, धारण केलेले कौशल्य तसेच पूर्वीच्या अनुभवानुसार यथोचित निवड प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड करता येईल. याकरिता संबंधित उद्योजक, आस्थापना प्रमुखांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची संख्या, आवश्यक मनुष्यबळाची माहिती washimrojgar@gmail.com या ई-मेलवर ९ जुलै २०२० रोजीपर्यंत पाठवून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.
Post a Comment