Header Ads

Shetkari karjmukti yojana : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा २७.३८ लाख शेतकऱ्यांना लाभ

shetkari karjmukti yojana, maharashtra shashan

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा २७.३८ लाख शेतकऱ्यांना लाभ

पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई दिनांक २० - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै  २०२० अखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील ८३ टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी- मुख्यमंत्री

     महात्मा जोतिराव फुले  शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविली जावी, जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

प्रक्रिया पुन्हा सुरु

     महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी २१ हजार ४६७ कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी १७ हजार ६४६ कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे.  योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये तसेच बँकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी २०१९-२० या आर्थिक वर्षात जवळजवळ १९ लाख खातेदारांना ११ हजार ९९३ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता तर २०२०-२१ या  आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण ५६५३  कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.

      योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या यादीतील उर्वरित ५.५२ लाख खातेदारांनी त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांना योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ मिळेल व त्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा होईल.  मार्च २०२० मध्ये राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे लागू झालेली आचारसंहिता व तद्नंतर कोविड-१९ या महामारीमुळे  काही ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणे शक्य झाले नव्हते. परंतु आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे.

No comments

Powered by Blogger.