Header Ads

04 जुलाई : ‘लॉकडाऊन’ची नवीन नियमावली लागू : जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे आदेश : Janta Parishad Washim

04 जुलाई : ‘लॉकडाऊन’ची नवीन नियमावली लागू

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे आदेश 

आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची सुविधा सुरु राहणार


प्रतिष्ठानांची वेळ सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 


वाशिम, दि. ०४ : जिल्ह्यात ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असून याबाबतची सुधारित नियमावली १ जुलै २०२० पासून लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील इतर दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास, तसेच मेडिकल स्टोअर, दवाखाने आदी अत्यावश्यक सेवा २४ तास सुरु ठेवण्यास मुभा राहील. सलून, ब्युटी पार्लर सुद्धा यापूर्वी ठरवून दिलेल्या नियमांनुसार सुरु राहतील. सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्यास अथवा गर्दी आढळून आल्यास आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

मास्क, गमछा, रुमाल बंधनकारक; थुंकल्यास 500 रुपये दंड  

जिल्ह्यात दुध संकलन व विक्री, भाजीपाला विक्री, कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंतच्या काळात सुरू ठेवण्यास मुभा राहील. तसेच बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहील. नगरपरिषद क्षेत्राबाहेरील पेट्रोलपंप २४ तास सुरु राहतील. नगरपरिषद क्षेत्रातील पेट्रोलपंप सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरु राहतील. सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयात अथवा आस्थापनेत, प्रवासादरम्यान चेहऱ्यावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर बंधनकारक राहील. तसेच सार्वजनिक व कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच सार्वजनिक व कार्यालयीन कामाच्या ठिकाणी मद्य सेवन, पान व तंबाखू खाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक

सार्वजनिक ठिकाणी व वाहतुकीच्या साधनांमध्ये सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. व्यक्तिगत अंतर्गत किमान ६ फुट इतके आवश्यक आहे. विवाह समारंभासाठी सोशल डिस्टसिंग नियमांच्या अधीन राहून जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. शासनाच्या २३ जून २०२० च्या नियमावलीच्या अधीन राहून खुल्या मैदानावर, लॉन्सवर, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यास परवानगी राहील. अंत्यविधीसाठी सुद्धा जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील.

दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ फुटचे अंतर राखावे 

सर्व आस्थापनाधारक, दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ फुटचे अंतर राहील, याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रेवेश देवू नये. व्यक्तींच्या संपर्कात येणारी ठिकाणे, वस्तूंचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. सर्व आस्थापनांनी सोशल डिस्टसिंगचे पालन होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात, जसे शिफ्टमध्ये काम करणे, कामगारांना मध्य भोजनासाठी वेगवेगळ्या वेळा ठरवून देणे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर इत्यादी बाबींची तजवीज संबंधित आस्थापना, प्रतिष्ठान यांनी करावी. त्यांचा वापर प्रवेशद्वारावर सातत्याने करावा. शक्य असेल तेथे कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक क्षेत्रे आणि व्यापारी संस्था यांनी वर्क फ्रॉम होम करावे. ५० पेक्षा जास्त व्यक्ती एकाच ठिकाणी गोळा होण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दुचाकीवर एक तर तीनचाकी व चारचाकी साठी ड्राइवर सह तीघांनाच परवानगी 

एका व्यक्तीसह दुचाकीकरिता तसेच चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक करण्यास तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना परवानगी राहील. जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह जिल्ह्यांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीला परवानगी राहील. दोन जिल्ह्यांमधील प्रवासासाठी वाहतुकीची व्यवस्था पूर्वी प्रमाणेच राहील. जिल्ह्यात येण्यासाठी अथवा जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता राहील.

वृत्तपत्र आणि शालेय सामुग्री बाबत नियम पाळणे गरजेचे  

बाह्य परिसरातील (आऊट डोअर) व्यायाम, कसरत बंधनांच्या अधीन राहून करता येईल. वृत्तपत्र छपाई व वितरण आवश्यक खबरदारी घेवून करता येईल. शाळेत महाविद्यालयांमध्ये शिकविण्याच्या उद्देशाशिवाय इतर बाबींसाठी जसे पेपर तपासणी, निकाल घोषित करणे, ई-लर्निंग, ई-सामग्री तयार करण्यासाठी जाता येईल. अत्यावश्यक असलेल्या बाबी जसे शॉपिंग, बाह्य परिसरातील व्यायाम मास्क वापरून, सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करता येईल. त्यासाठी जास्त दूर जाता येणार नाही.

वेळोवेळी दिलेले प्रशासनाचे आदेश पाळावेत    

स्थानिक परीस्थिती लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यात आवश्यकतेप्रमाणे वाशिम जिल्ह्यासाठी अथवा जिल्ह्यातील एखाद्या भागासाठी अत्यावश्यक सेवा वगळता परवानगी दिलेल्या इतर सेवा बंद करता येणार आहेत. लोकांची ये-जा अशा भागांसाठी बंद करता येईल. त्यासाठी आवश्यकतेनुसार वेळोवेळी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईलअसे जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाशिम जिल्ह्याचे व राज्यातील इतर महत्वांच्या बातम्या व माहिती साठी खालील जनता परिषद पोर्टल वर क्लिक करा


https://www.jantaparishad.com/


No comments

Powered by Blogger.