Header Ads

वाशिम जिल्हयात चार मद्यविक्री परवाने निलंबित


राज्य उत्पादन शुल्क विभाग 
वाशिम जिल्हयात चार मद्यविक्री परवाने निलंबित

अवैध दारू धंद्यावर कारवाई; साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त

     वाशिम, दि. ०३ (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अवैध दारूधंदे, जादा दराने मद्यविक्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई करून दंड वसूल केल्याची माहिती अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.
     एप्रिल व मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३४ अवैध दारूधंद्याविरुद्ध धाडी टाकून कारवाई केली. या प्रकरणी गुन्हे नोंदवून २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच चार दुचाकी, एक चारचाकी वाहन जप्त करून ६ लाख ५१ हजार ९३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जादा दराने मद्यविक्री करणाऱ्या तसेच सरासरी विक्री पेक्षा जास्त मद्यविक्री करणाऱ्या, त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अबकारी मद्यविक्री परवानाधारकांवर १० नियमभंग प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.
     नियमभंग प्रकरणी एक एफएल-३, दोन एफएलबीआर-२ व एक सीएल-३ असे एकूण ४ मद्यविक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच दंडात्मक कार्यवाहीद्वारे ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे १ लाख २९ हजार मद्यसेवन परवाने वितरीत करून ३ लाख ९९ हजार इतका महसूल संकलित करण्यात आल्याची माहिती श्री. कानडे यांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.