Header Ads

पीक कर्ज वितरणाची गती वाढवा


पीक कर्ज वितरणाची गती वाढवा

 पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश 


·        प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक मिळणे आवश्यक
·        नॉन-कोविड रुग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा द्या
·        पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज रहा

वाशिम, दि. ०३ (जिमाका) : पावसाळा सुरु झाल्यानंतर पेरणीची कामे सुरु होतील. शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करण्याकरिता वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. आज, ३ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. गडेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर हे वाशिम येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पीक कर्ज वितरणाबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेले मात्र अद्याप कर्जमुक्ती न मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सर्व बँकांनी त्यानुसार कार्यवाही करावी. जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवून पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
हमीभावाने कापूस खरेदीसाठी नोंदणी केलेल्या सुमारे ९ हजार ३०० शेतकऱ्यांची कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. उर्वरित जवळपास २८०० शेतकऱ्यांची कापूस खरेदी सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच हमीभावाने तूर, चना खरेदीची कार्यवाही सुधा गतिमान करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी आढावा घेतला. लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. मास्कचा वापरसोशल डिस्टसिंगचे पालन होईल, याची खबरदारी घ्यावी. परजिल्ह्यातून, परराज्यातून परतलेल्या नागरिकांचा सर्व्हे करून त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
ग्रामीण भागात नॉन-कोविड रुग्णांना घरपोच औषधे द्या
आगामी पावसाळ्याच्या काळात कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराचे रुग्ण सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने अशा रुग्णांवर सुद्धा वेळेवर उपचार करावेत. पावसाळ्यात साथरोग पसरू नये, यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. पावसाळ्यात सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा होईल, याची खबरदारी घ्यावी. तसेच ग्रामीण भागात व प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये वैद्यकीय पथके स्थापन करून ‘नॉन-कोविड’ रुग्णांना घरोघरी जावून उपचार व औषधे उपलब्ध करून द्यावी. विशेषतः वृद्ध रुग्णांची काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, परजिल्ह्यातून व परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून यापैकी ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळणाऱ्या लोकांची कोरोना विषयक तपासणी केली जात आहे. यापुढे जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पीक कर्ज वाटप व इतर विषयांबाबत माहिती दिली. तसेच आगामी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असलेले आरोग्य विषयक सर्वेक्षण, शाळा सुरु करण्याबाबतचे नियोजन याविषयी माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी लॉकडाऊन नियमांच्या अंमलबजावणी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याविषयी माहिती दिली.

No comments

Powered by Blogger.